कंग्राळी खुर्दच्या युवकाची पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या
बेळगाव : श्रीराम गल्ली, कंग्राळी खुर्द येथील एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारुती गल्ली येथे घडली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून दिवाळी पाडव्यादिवशी बुधवारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. विशाल परशुराम शहापूरकर (वय 43) राहणार श्रीराम गल्ली, कंग्राळी खुर्द असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
उपलब्ध माहितीनुसार बुधवारी सकाळी विशाल हातात पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन मारुती गल्ली येथील आपल्या पत्नीच्या माहेरी आला होता. सकाळी त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडण्यास सांगितले. पत्नीने घाबरून कडी काढली नाही. याच वेळी बाटलीतील पेट्रोल आपल्या अंगावर ओतून घेऊन त्याने पेटवून घेतले. भाजून गंभीर जखमी झालेल्या विशालला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता 12.25 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. विशालच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.