कंग्राळी खुर्द गाव डॉल्बीमुक्त करून विवाह मुहूर्तावर लावणार
ग्राम पंचायत नवजागृती सेवा संघासह अन्य मंडळांचा निर्धार : ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावामध्ये जनजागृती
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावातील कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम हे डॉल्बीमुक्त करून गावात होणारे सर्व विवाह लग्नपत्रिकेत छापलेल्या मुहूर्तावरच लावण्याचा निर्धार कट्टा बैठकीतून करण्यात आला आहे. यासाठी ग्रा. पं. नवजागृती सेवा संघ व गावातील अन्य विविध मंडळांनी पुढाकार घेऊन हे विधायक पाऊल उचलले असून गावात जनजागृती सुरू केली आहे. ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर येथे वॉर्ड क्र. 1 व 2 मधील ग्रा. पं. सदस्य, नवजागृती सेवा संघाचे पदाधिकारी, कलमेश्वर युवक मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील जागृत नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वप्रथम उचगाव व वडगाव येथील ग्रामस्थांनी मळेकरणी देवस्थान परिसर व वडगाव मंगाई देवस्थान परिसरात पशुहत्येसंदर्भात विधायक निर्णय घेऊन एक वेगळा विधायक उपक्रम राबविल्याबद्दल या दोन्ही गावांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविक करून सभेचा उद्देश सांगितला. धार्मिक व सामाजिक कार्यात कर्णकर्कश डॉल्बी लावून धिंगाणा सुरू आहे. यामुळे नियोजित लग्न दोन ते तीन तास उशिरा लागत आहे. यावर लगाम लावायचा असतो. तर सर्वप्रथम स्वत:पासून सुरुवात करावी लागणार म्हणून आता महिनाभर गावात मंदिरातून कट्टा बैठका घेऊन जागृती करून या अनिष्ट प्रथा बंद करूया, असे आवाहन केले. यानुसार ग्रा. पं. सदस्या लता पाटील, मीना मुतगेकर, प्रशांत पाटील ग्रामस्थ प्रफुल्ल पाटील, शाम सदलगेकर, जे. के. पाटील नवजागृती संघाचे जोतिबा पाटील, दिनेश मुतगेकर, नवजागृती सेवा संघाचे अध्यक्ष टी. डी. पाटील, पी. वाय. पाटील. पी. बी. मास्तीहोळी यांनी विधायक मते मांडून सर्वांना विश्वासात घेऊन डॉल्बीमुक्त व वेळेत लग्ने कशी लावता येतील यावर बैठका घेण्याचे ठरले. यावेळी हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धारही करण्यात आला. तसेच या आशयाचे निवेदन एपीएमसी पोलीस स्थानक, एसपीडीसी यांना पुढील आठवड्यात देण्याचे ठरले. यावेळी वरील मान्यवरांसह ज्योती निलकंठाचे, विवेक पाटील, अमृत पाटील, प्रफुल्ल पाटील, व्यंकट मोरे, प्रल्हाद मुतगेकर, रणजित पाटील, विनोद पाटील, भीमराव कणबरकर, प्रकाश पाटील, संजय कंग्राळीमठ गावातील विविध मंदिराच्या पुजारींसह श्री कलमेश्वर युवक मंडळ, जनजागृती सेवा संघ कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. टी. डी. पाटील यांनी आभार मानले.