कंग्राळी खुर्द मुख्य रस्ता पेव्हर्स उखडून बनला खड्डेमय
अपघातांची मालिका : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
ए.पी.एम.सी.कडून कंग्राळी खुर्द गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ए.पी.एम.सी. दुसऱ्या गेटसमोरील रस्त्यावरील पेव्हर्स उखडून रस्ता खड्डेमय झाला असल्यामुळे या ठिकाणी दररोज लहान-मोठ्या अपघतांची मालिका सुरू आहे. संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इकडे त्वरित लक्ष देऊन खड्डे बूजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी होत आहे. सदर रस्ता कंग्राळी खुर्द गावच्या प्रवेशद्वारापर्यंत स्मार्ट सिटी निधीतून झाला असून आता याची देखभाल महानगरपालिकेकडे असल्याचे समजते. सदर रस्त्यावरुन कंग्राळी खुर्दच्या पुढील जवळ-जवळ 20 ते 25 गावचे नागरिक दररोज ये-जा करत असतात. रस्त्याच्या देखभालीअभावी एपीएम्.सी. दुसऱ्या गेटसमोरील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पेव्हर्स बसवले होते. परंतु आता ते उखडल्यामुळे खड्डे पडले आहेत. रस्ता उतरणीचा असल्यामुळे खड्ड्यातून घसरुन दुचाकी वाहनधारक पडून जखमी होत आहेत. घसरुन पडलेल्या नागरिकांनी ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, विनायक कम्मार, वैजनाथ बेन्नाळकर यांना रस्त्याची दुर्दशा दाखविली. आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना गेटसमोरील रस्त्याची परिस्थितीची जाणीव करून देऊन खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याचे आश्वासन दिले.