कंग्राळी खुर्द ग्रा. पं. वॉर्ड 1 ची निवडणूक बिनविरोध
वॉर्ड 13 साठी 23 नोव्हेंबरला निवडणूक
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतच्या वॉर्ड क्र. 1 मधील पोटनिवडणुकीत रेणुका अमोल पावशे यांची बिनविरोध निवड झाली. तर वॉर्ड क्र. 13 (अलतगा) मध्ये एक मत न झाल्याने तेथील एका जागेसाठी 23 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये अलतगा गाव आहे. कंग्राळी खुर्द ग्रा. पं.च्या वॉर्ड क्र. 1 मधील एका सदस्याने आपल्या काही तांत्रिक अडचणींमुळे राजीनामा दिला होता. तर वॉर्ड क्र. 13 मधील सदस्य मयत झाल्याने ती जागा रिक्त होती. त्यानुसार वॉर्ड 1 मध्ये महिला राखीव असल्याने रेणुका अमोल पावशे, सुरेश मनोहर पाटील, कोमल राजगोळकर, पार्वती शंकर पावशे, करिश्मा प्रशांत पाटील या पाच इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. तसेच त्यांचे अर्ज वैधही ठरले होते.
शुक्रवारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घ्यावयाची मुदत होती. निवडणूक होणार असे वाटत होते. परंतु माजी उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, परशराम निलजकर, सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, विनायक कम्मार, महेश खंडागळे, भैय्या पाटील, भूषण तम्मन्नाचे, मनोहर पाटील यांनी पाचही उमेदवारांचे समुपदेशन करताना शिवाजी गल्लीला आजपर्यंत एकदाही प्रतिनिधीत्व मिळाले नाही. त्यानुसार त्या गल्लीलाही संधी देवूया, असा सर्वानुमते मुद्दा घेवून चर्चा केली. त्यानुसार चारही उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे निवडणूक अधिकारी वेंकटेश बळगी, गोपाळ नाईक यांनी रेणुका पावशे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
वार्ड 13 मध्ये तिरंगी लढत
वार्ड 13 (अलतगा) मध्ये बंडू सुतार, गणपत सुतार, प्रमोद शिंदे या तिघानी भरलेले अर्ज वैध ठरल्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी तिरंगी लढत होणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी 2025 मधील डिसेंबरमध्ये या गावची ग्राम पंचायत निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याची ही नांदी आहे, अशीही चर्चा उपस्थित ग्रामस्थांतून ऐकावयास मिळत होती. वार्ड क्रमांक 1 मधील बिनविरोध विजयी उमेदवार रेणूका पावशे यांचा माघार घेवून त्यांना पाठिंबा व्यक्त केलेल्या उमेदवारांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी दीपक पावशे, प्रवीण पाटील, अमोल पाटील, कांता पावशे, दीपक कंग्राळकर, शाहीर बाबुराव पाटील, राजू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.