कंग्राळी बुद्रुकचा किगदी तलाव फुटला
सुदैवाने शेतीचे नुकसान टळले : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये पाण्यात गेल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
येथील किगदी तलाव मंगळवारी अनंतचतुदर्शीदिवशी दुपारी 4 वाजता फुटल्यामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. तलावातील मोठ्या लोंढ्याचा प्रवाह ओढ्यातून थेट गावच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला मिळाला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे तलाव फुटल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य आणि नागरिकांनी केला असून, तलाव फुटल्यामुळे नागरिकांतून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यामुळे लाखो लिटर पाणी मार्कंडेय नदीला मिळाले. शेवटी ग्रा. पं. सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने फुटलेला तलाव बांधल्यामुळे शेतकरी वर्गाचा जीव भांड्यात पडला. तलावाच्या ठिकाणी ग्राम पंचायत सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, अनिल पावशे, तानाजी पाटील, उमेश पाटील, बंदेनवाज सय्यद, फारुख पठाण, सद्याप्पा राजकट्टी, सुरेश राठोड पीडीओ रंगाप्पगोळ आदींनी जेसीबी मागवून पाणी बंद केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
तलावाच्या पूर्व दिशेला अतिक्रमण झाल्याच्या प्रतिक्रिया ग्राम पंचायत सदस्य व शेतकरी वर्गाने तरुण भारतशी बोलताना व्यक्त केल्या. तलावाचे क्षेत्रफळ 9 ते 10 एकर आहे. तलावाच्या क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करून अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पाटबंधारे खाते यांना ग्राम पंचायतीतर्फे निवेदन देण्याचे आश्वासन ग्रा. पं. सदस्यांनी दिले. पाणलोट ठिकाणावरुन पाणी न गेल्यानेच तलाव फुटला. पूर्व दिशेला तलावाच्या बाजूने सपाट जागा झाल्यामुळे तलावाचे पाणी सपाट जागेवरुन जाऊन तलाव फुटला. तलावाच्या पूर्व दिशेने बांध असता तर तलाव तुडुंब भरल्यानंतर उर्वरित पाणी पाणलोट ठिकाणावरुन जात राहाते. यामुळे तलावाला फुटण्याचा धोका होत नाही. परंतु तलावाच्या या परिस्थितीकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे सदर तलाव फुटल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
‘त्या’ दोन शेतकऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे नुकसान टळले
शेतकरी प्रभू गुंडू पाटील व बाळू रामगोंडा हे मंगळवारी शेताकडे गेले होते.अचानक ओढ्याला आलेल्या पाण्याचा लोंढा पाहून त्यांना किगदी तलाव फुटल्याचा अंदाज व्यक्त करून दोघांनी ओढ्यातील साकोरा व एकेक ठिकाणी झाडांच्या तुटलेल्या फांद्या बाजूला करून पाणी ओढ्यातून जाण्यास वाट करून दिली. त्यामुळे ओढा कुठेही फुटाला नाही आणि भातशेतीचे नुकसान टळले. दोघांच्या कार्यतत्परतेमुळे शेतीचे नुकसान झाले नसल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तलावाच्या पूर्व बाजूला बांधाला रस्ताच नसल्यामुळे सपाट भागावरुन पाणी वाहून तलाव फुटला. कारण तलावाच्या देखभालीकडे पंचायत अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच तलाव फुटून लाखो रुपये पाण्यात गेल्याची खंत ग्रा. पं. सदस्यासह इतरांनी व्यक्त केली.