For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक येथील विठ्ठलाई मंदिराला टाळे

10:28 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक येथील विठ्ठलाई मंदिराला टाळे
Advertisement

मात्र भाविकांच्या धार्मिकतेचा विचार करून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दरवाजे केले खुले

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक 

कंग्राळी बुद्रुक गावच्या पूर्व दिशेला असलेले जागृत ग्रामदैवत श्री विठ्ठलाई मंदिर सातबारा मालक व मंदिराचे पुजारी यांच्यातील वादामुळे सातबारा मालकाने कुलूप लावून मंदिर बंद केले. परंतु पुजारी व भाविकांच्या धार्मिकतेचा विचार करून तसेच पुजाऱ्यांच्या तक्रारीचा विचार करून एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन यांनी गुरुवारी मंदिरस्थळी येऊन भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करून पुजारी व भाविकांना दिलासा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक गावच्या पूर्व दिशेला वैभवनगर परिसरात सर्व्हे नं. 37 मध्ये 16 गुंठे आवारातील जागेमध्ये कंग्राळी बुद्रुक गावातील समस्त पाटील बंधूंचे श्री विठ्ठलाई मंदिर बांधण्यात आले आहे. सदर मंदिर जागृत व नवसाला पावणारे म्हणून पाहिले जाते. गावासह परिसरातील व दूरदूरचे अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी सदर मंदिराला भेट देतात. पाटील बंधू पूर्वजानी बांधलेल्या छोट्या मंदिराचा उद्योजक गणेश शेट्टी यांनी 27 लाख रुपये स्वखर्चातून जीर्णोद्धार केला. मध्यंतरी गणेश शेट्टी यांनी पशुहत्येला बंदी घालून मंदिरमध्ये ब्राह्मण भटजीची नेमणूक केली. यामुळे ज्यांचे मंदिर होते. त्यांनाच मंदिर प्रवेश बंद झाल्यामुळे सर्व पाटील बंधू व ग्रामस्थांनी एकत्र होऊन ब्राह्मण भटजींना हटवून मंदिर प्रवेश करून जी धार्मिक परंपरा होती ती अखंड सुरू केली.

Advertisement

नवसाला पावणारे मंदिर 

कंग्राळी बुद्रुक गावातील समस्त पाटील बंधूंचे नवसाला पावणारे मंदिर म्हणून पाहिले जाते. गावातील किंवा माहेरवासिनी आपला नवस फेडण्यासाठी एकदा तरी या ठिकाणी बकऱ्याचा बळी देऊन पै पाहुणे व ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करतात.

2007 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार

पाटील बंधूंच्या वडीलधारी मंडळींनी बांधलेले मंदिर पूर्वी लहान होते. त्यानंतर 2007 साली उद्योजक गणेश शेट्टी यांनी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून गणपत ओमाणा पाटील यांच्या परिवाराकडून मंदिराची पूजा-अर्चा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सर्व्हे नं. 37 मधील 16 गुंठे जमिनीचे सातबारा मालक भाऊराव परशराम पाटील, लक्ष्मी परशराम पाटील, उमेश परशराम पाटील, सुरेश भावकाणा पाटील, सचिन सुरेश पाटील, प्रमोद सुरेश पाटील म्हणाले, सदर मंदिराची जागा आमची आहे. यापूर्वी आम्ही कंग्राळी बुद्रुक गावामध्ये रहायला होतो. आता आम्ही येथेच घरे बांधलेली आहेत. यामुळे आमच्या देवीची पुजारी या नात्याने पूजा करण्याची आमचीही इच्छा आहे. मंदिर आवारात आपले नवस फेडण्यासाठी भाविक बकऱ्यांचा बळी देतात परंतु बळी दिलेल्या बकऱ्यांचे टाकाऊ अवशेष मंदिराच्या बाजूला टाकून दुर्गंधी पसरवित आहेत. तसेच देवस्थान पंच कमिटीला विचारले असता तू जर मंदिराच्या जागेचा मालक आहेस तर कुलूप लावून मंदिर बंद कर असेही सांगितले. तसेच मंदिरमध्ये कार्यक्रम करणाऱ्याकडून पावती रुपाने पुजारी जी रक्कम घेतो त्याचा अजूनपर्यंत हिशोबच देण्यात आला नाही. त्यामुळे वरील सर्व बाबींना वाचा फोडण्यासाठी आम्ही कुलूप लावून मंदिर बंद केल्याचे तरुण भारतशी बोलताना सांगितले.

जवळजवळ 52 वर्षांपासून पूजा

यावेळी पुजारी कल्लाप्पा ओमाण्णा पाटील, शंकर ओमाण्णा पाटील, गीता कल्लाप्पा पाटील, कविता शंकर पाटील, लक्ष्मी गणपत पाटील, मलप्रभा तानाजी पाटील यांनी सांगितले की, जवळजवळ 52 वर्षांपासून कल्लाप्पा ओमाण्णा पाटील यांचे कुटुंबीय विठ्ठलाई मंदिराचे पुजारी म्हणून सेवा करत असून मंदिरमध्ये आपला नवस फेडण्यासाठी जे भाविक बकरी मारून मांसाहार प्रसादाचे वाटप करतात त्यांचेकडून मंदिर देखभाल खर्चासाठी घेतलेल्या रकमेची रितसर पावती दिली जाते. तसेच तो पैसा मंदिराच्या देखभालीसाठी खर्च केला जातो. सर्व्हे नं. 37 मधील 16 गुंठे जागा ही मंदिरासाठी म्हणूनच आपल्या पाटील बंधू पूर्वजांना सोडलेली असल्याचेही सांगितले. यामुळे सदर मंदिर हे पाटील बंधूंचेच आहे. असेही त्यांनी सांगितले. भाऊराव पाटील यांनी मंदिराला कुलूप लावून मंदिर बंद केल्याचे ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंच कमिटी, मंदिर सेवा समिती व ग्रामस्थांना कळविले असता कुणीही प्रतिसाद दिला नाही, असे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन यांनी मंदिराला कुलूप लावून कोणीही भाविकांची धार्मिकता दुखवू नये. तुम्ही सातबारा मालक आहात मंदिर तुमच्या जागेमध्ये आहे. यांची रितसर कोर्टऑर्डर हजर केल्याशिवाय मंदिराला कुलूप लावणे  गुन्हा आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, असे सांगितले. कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत देवस्थान पंच कमिटी, मंदिर सेवा समिती, समस्त पाटील बंधू व ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावून या समस्येवर तोडगा काढून भाविकांना दिलासा देण्याची मागणी मंदिराचे पुजारी कल्लाप्पा पाटील यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.