कंग्राळी बुद्रुक श्री लक्ष्मीदेवी यात्रा 28 एप्रिल 2026 रोजी
यात्रा 43 वर्षांनंतर भरत असल्याने मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 28 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्याचे निश्चित झाले आहे. श्रावण मासातील पहिल्या सोमवारच्या शुभमुहूर्तावर ग्रा.पं. कार्यालयामध्ये ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा यांनी ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंचकमिटी व यात्रा कमिटीच्या उपस्थितीत ग्रा. पं. कार्यालयामध्ये 28 एप्रिल 2026 रोजी ग्रामस्थांनी श्री लक्ष्मीदेवीची यात्रा साजरी करण्याचे जाहीर केले. जवळजवळ 43 वर्षांनी यात्रा साजरी होणार असल्यामुळे ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला असून आपल्या गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा मोठ्या जल्लोषात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
यापूर्वी 1983 साली यात्रा साजरी करण्यात आली होती. आता जवळजवळ 43 वर्षांनी ग्रामस्थांनी यात्रा साजरी करण्याचा योग आला असून यात्रा 9 दिवस साजरी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रारंभी श्री लक्ष्मीदेवीच्या मंदिरामध्ये ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा यांच्या हस्ते ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीचे पूजन करण्यात आले. यानंतर ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंचकमिटी सदस्य, यात्रा कमिटी व ग्रामस्थ मिरवणुकीने ग्रा.पं. कार्यालयाकडे आले. यावेळी देवस्थान पंचकमिटी सदस्य व यात्रा कमिटी सदस्यांनी 28 एप्रिल रोजी यात्रा भरविण्याचे निश्चित केल्याची प्रत ग्रा.पं.अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली.
प्रतमधील मजकूर वाचून ग्रा.पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा यांनी ग्रामस्थांनी 28 एप्रिल रोजी यात्रा साजरी करण्याचे निश्चित केल्याचे जाहीर केले. यावेळी पिडीओ गोविंद रंगाप्पगोळ यांनीही ग्रा. पं. निधीतूनही जेवढी विकासकामे करता येतील ती यात्रेपूर्वी करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शंकर कोनेरी, राजू मन्नोळकर यांनीही यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी वाहने पार्किंग करण्यासाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशेकडे योग्य नियोजन करणे, चारी बाजुने संपर्क रस्ते तयार करणे, जेणेकरुन यात्रेसाठी आलेल्या पै पाहुणे व भाविकांची गैरसोय होणार नाही. याची आपल्या मनोगतातून जाणीव करून दिली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंचकमिटी सदस्य, यात्राकमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.