कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्ता 40 फूटच
ग्रा. पं. ने बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये शेतकरी ठाम : नागरी समस्या सोडवण्यासाठी 10 कोटी मंजूर
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर मुख्य रस्त्याचा तिढा संपता संपेना. गुरुवारी ग्रा. पं. ने रस्ता रूंदीकरणामध्ये दोन्ही बाजूचे जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना परत चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते. परंतु आमच्या बैठकीमध्येही रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने 20-20 फूट जागा घेऊन 40 फूटच रस्ता रूंदीकरणावर आम्ही ठाम असून रस्ता करण्यासाठी आमचा कोणताच विरोध नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त करण्यात आल्या. गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा 28 एप्रिल 2026 ते 9 मे पर्यंत जवळजवळ 43 वर्षांनी ग्रामस्थांना साजरी करण्याचा भक्तीमय योग आला आहे.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक मुख्य रस्त्याचे दोन्ही बाजूने काँक्रीट गटारी व डांबरीकरण व गावातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नाने त्यांच्या फंडातून 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्याचे रूंदीकरण शाहूनगरपासून ते वसुंधरा मंगल कार्यालयापर्यंत मध्यापासून 30-30 फूट घेऊन 60 फूट रस्ता रूंदीकरण तर कार्यालय ते गावच्या तलावापर्यंत 40 फूट रस्ता रूंदीकरण होणार, असे ग्रा.पं. सदस्यांनी रस्ता मार्कींग करतेवेळी सांगितल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले व शेतकऱ्यांनी शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक गावापर्यंत संपूर्णच रस्ता 40 फूट करण्याचे सांगत त्यांनी काम बंद पाडले होते.
गुरुवारी ग्रा. पं. ने बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीवेळी व्यासपीठावर ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, उपाध्यक्षा दिपा पम्मार, पीडीओ गोपाळ नाईक, एस. डी., कर्मचारी मलप्रभा कणबर्गी उपस्थित होते. रेगा इंडिकर प्रारंभी ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे, यल्लोजी पाटील यानी शाहुनगरला वसुंधरा मंगल कार्यालय पर्यंतच्या रस्त्यांचे दोन वर्षापूर्वी केलेले मार्कींग तसेच कार्यालयापासून पुढे बुडा ले आऊट केलेल्या जमिनी संदर्भात व ग्रा. पं. ने रस्ता मार्कींग केल्यानंतर लेआऊट मालकानी रस्त्याच्या एका बाजूने गटारी बांधल्या. विद्युतखांब उभे केले.
त्याला ग्रा.पं. ने विरोध केल्यानंतर कोर्टाचा आधार घेऊन त्यांनी आपले काम कसे पूर्ण केले. तसेच सदर प्रकरण कोर्टात गेले असल्याने ग्रा. पं.ला बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय तसे काम करता आले नाही. याची सविस्तर माहिती त्यांनी मनोगतातून सांगितली. यानंतर ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा व पीडीओ गोपाळ नाईक म्हणाले, वसुंधरा मंगल कार्यालयाच्यापुढे तलावापर्यंतच्या रस्त्याला पूर्व बाजूला बुडा ले आऊट प्लॉट पाडण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी ग्रा. पं. च्यावतीने त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. कारण ते प्रकरण बुडा ले आऊट जमीन मालकांनी कोर्टामध्ये दाखल केलेले असल्यामुळे सदर जमिनीच्या मूळ मालकांना बोलावून सदर रस्त्याचा तिढा सोडवायला मार्ग मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रा. पं, सर्व सदस्य,सदस्यांसह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकरी 40 फूटच रस्ता रूंदीकरणावर ठाम
रस्त्यामध्ये जमीन गेलेले शेतकरी सुभाष हुद्दार समस्त शेतकऱ्यांच्यावतीने मत मांडताना म्हणाले गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे भाग्य उजळले आहे. रस्ता रूंदीकरणासाठी आपण कोणताच विरोध नाही यासाठी ग्रा.पं. ने प्रथम तलावापासून प्रथम सदर रस्ता मध्यापासून दोन्ही बाजूने 20-20 फूट रस्ता करण्यासाठी सुरू करणे आमचा रस्ता रूंदीकरणासाठी कधीच विरोध नाही आम्ही स्वखुशीने रस्त्यामध्ये आमच्या जमीनी देत आहोत तेव्हा ग्रा.पं. ने त्वरीत तोडगा काढून रस्ता कामासाठी सुरूवात करण्यासाठी मागणी केली.