For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षावर अविश्वास ठराव संमत

11:09 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक ग्रा  पं  अध्यक्षावर अविश्वास ठराव संमत
Advertisement

27 ग्रा. पं. सदस्यांनी हात उंचावून अविश्वास ठराव केला संमत : नूतन अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

येथील ग्रामपंचायत अध्यक्षा कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांकडून दाख्ल केलेला अविश्वास ठराव शुक्रवारी 27 सदस्यांच्या संमतीने संमत करण्यात आला. कौसरजहाँ सय्यद या गावची विकासकामे करण्यात असमर्थ ठरल्याचा ठपका ग्रा. पं. सदस्यांकडून ठेवण्यात आला. यावेळी 7 ग्रा. पं. सदस्य अनुपस्थित होते. शासकीय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी दिनेशकुमार मीना उपस्थित होते. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. चे कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड असे कार्यक्षेत्र आहे. दोन्ही गावचे मिळून एकूण 34 सदस्य आहेत. शुक्रवारी दुपारी 12 वाजता अप्पर जिल्हाधिकारी दिनेशकुमार मीना सभागृहात आल्यानंतर कार्यवाहिला सुरुवात झाली. यावेळी 34 पैकी 27 सदस्य उपस्थित होते. 7 सदस्य गैरहजर होते. दिनेशकुमार यांनी उपस्थित 27 सदस्यांना हात उंचावून आपले मत मांडण्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व 27 सदस्यांनी हात उंचावून अध्यक्ष विरोधात अविश्वास ठरावाचे मत मांडले.

Advertisement

यामुळे दिनेशकुमार मीना यांनी अध्यक्षा कौसरजहाँ बंदेनवाज सय्यद यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याचे घोषित केले व पुढील नूतन अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी व जि. पं. कार्यालयात कळवून अध्यक्ष निवडीची तारीख कळविण्यात येईल असे सांगितले. 2020 साली निवडणूक झाली. तेव्हा सव्वा वर्षाच्या कार्यकाळात तत्कालीन ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले व उपाध्यक्ष अनिल पावशे यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार पूनम पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी यल्लोजी पाटील यांची निवड झाली. त्यानंतर शासकीय नियमानुसार पुढील अडीच वर्षाकरिता कौसरजहाँ सय्यद यांची अध्यक्षपदी तर दिपा पम्मार उपाध्यक्षपदी निवड केली. परंतु कौसरजहाँ सय्यद यांच्या कारकिर्दीत विकासकामे होत नसल्यामुळे गावचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेऊन 11 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर अविश्वास ठराव संमत होणार होता. परंतु सय्यद यांनी धारवाड हायकोर्टकडून स्थगिती मिळविल्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला होता. परंतु धारवाड हायकोर्टातून उर्वरित सदस्यांनी स्थगिती उठविल्यामुळे 31 जानेवारीची तारीख दिली. त्यानुसार 27 सदस्यांनी कौसरजहाँ सय्यद यांच्यावर अविश्वास ठराव संमत केल्याचे अप्पर जिल्हाधिकारी दिनेशकुमार मीना यांनी घोषित केले.

विकासाकडे दुर्लक्ष केल्याने ठराव संमत 

अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद यांनी गावच्या विकासकामाकडे दुर्लक्ष केले. आपण आजारी असल्याचे सांगून अनेक महिने मासिक बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे शासनाकडून विकासकामांसाटी आलेला निधी नियोजन होत नसल्यामुळे परत जात होता. यामुळे गावातील विकासकामे खोळंबली. गावच्या विकासासाठी सर्व 27 सदस्यांनी हा अविश्वास ठराव संमत केला.

- ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील

गावच्या सर्वांगीण विकासासाठीच अविश्वास ठराव

गाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कौसरजहाँ सय्यद यांची अध्यक्षपदी निवड केली होती. परंतु त्यांनी विकास कामांकडे दुर्लक्ष केले. यामुळे शासनाकडून  आलेला मोठा निधी परत गेला. जलजीवन योजना अजून अपूर्ण आहे. गावचा मुख्य रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. हे केवळ अध्यक्षांच्या दुर्लक्षामुळे झालेले आहे.

- ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे

Advertisement
Tags :

.