कांगारुंचा वर्ल्डकप विजयाचा षटकार
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप : टीम इंडियावर 6 गडी राखून विजय, सामनावीर ट्रेव्हिस हेडचे शानदार शतक
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयसीसी वर्ल्डकपमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाला तब्बल 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती, मात्र ती हुकली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकत नवा इतिहास रचला आहे. कांगारुंनी 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर कब्जा केला होता. यानंतर 1999, 2003, 2007, 2015 व 2023 मध्ये जेतेपद पटकावले आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जबरदस्त कामगिरी करताना वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. अंतिम सामन्यात देखील अगदी सुरुवातीपासूनच शानदार खेळ साकारणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद राहिली. याउलट, सलग 11 सामने जिंकत अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाने अखेरच्या क्षणी नांगी टाकली. पहिल्या 10 षटकांमध्ये दमदार खेळ केल्यानंतर नंतरच्या 40 षटकांमध्ये टीम इंडियाची जी फलंदाजीमध्ये वाहतात झाली, तीच पराभवासाठी कारणीभूत ठरली. तरीही टीम इंडियाची गोलंदाजी पाहता काहीतरी चमत्कार होईल अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच होऊ शकलं नाही.
ट्रेविस हेडचे शानदार शतक, लाबुशेनचीही अर्धशतकी खेळी
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्या लक्ष्य गाठले. या महत्वपूर्ण अंतिम सामन्यात ट्रेविस हेडने 137 धावांची सामना जिंकणारी शतकी खेळी खेळली. त्याने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकार मारले. भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. तर मार्नस लाबुशेनने 110 चेंडूत 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, भारताने दिलेल्या 241 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्याच षटकात 15 धावा वसूल करत इरादे स्पष्ट केले होते. पण मोहम्मद शामीने दुसऱ्याच षटकात वॉर्नरचा (7) अडथळा दूर केला. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शही फार काळ तग धरु शकला नाही. बुमराहने मार्शचा अडथळा दूर केला. त्याने 15 चेंडूत 15 धावा केल्या. स्मिथ फक्त चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी 192 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 5 व्या षटकातच शुबमन गिलच्या (4) रूपाने पहिली विकेट गमावली. कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची इनिंग खेळून संघाला आवश्यक ती सुरुवात करून दिली. रोहित आणि विराट कोहली यांच्यातील भागीदारी अवघ्या 46 धावांपर्यंत पोहोचली होती, तेव्हा 10 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने रोहितला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हिटमॅनने 31 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.
विराट, राहुलची अर्धशतके
मागील दोन सामन्यात शतकी खेळी साकारणारा श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद होवून पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची (109 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी पॅट कमिन्सने विराट कोहलीला बाद करत मोडली. विराट 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजा 36व्या षटकात वैयक्तिक 09 धावांवर हेझलवूडचा बळी ठरला. यानंतर राहुलने संयमी खेळी करताना 107 चेंडूत 1 चौकारासह 66 धावा केल्या. राहुल 42 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी भारताची धावसंख्या 6 बाद 203 अशी होती. त्यानंतर शमीला मिचेल स्टार्कने 6 धावांवर बाद केले, तर बुमराह 1 धावेवर बाद झाला. कुलदीप यादवने 18 चेंडूत 10 व मोहम्मद सिराजने नाबाद 9 धावा करत संघाला 240 धावांचा टप्पा गाठून दिला. पण, अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीप बाद झाला व भारताचा डाव 240 धावांवर संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत सर्वबाद 240 (रोहित शर्मा 47, शुबमन गिल 4, विराट कोहली 54, श्रेयस अय्यर 4, केएल राहुल 66, रविंद्र जडेजा 9, सुर्यकुमार यादव 18, कुलदीप यादव 10, सिराज नाबाद 9, स्टार्क 55 धावांत 3 बळी, हॅजलवूड 2 बळी, कमिन्स 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 43 षटकांत 4 बाद 241 (वॉर्नर 7, ट्रेव्हिस हेड 137, मिचेल मार्श 15, लाबुशेन नाबाद 58, मॅक्सवेल नाबाद 2, बुमराह 43 धावांत 2 बळी, शमी, सिराज प्रत्येकी एक बळी).
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुर्यकिरण विमानांचा थरार
क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलची नाणेफेक झाल्यानंतर लगेचच हवाई दलाच्या विमानांची गर्जना झाली. टॉसनंतर लगेचच भारतीय हवाई दलाची विमाने स्टेडियमच्या वर आकाशात दिसली. हवाई दलाची ही विमाने अहमदाबादच्या आकाशात 15 मिनिटे थरारक स्टंट करत राहिली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने हा एअर शो सादर केला. यावेळी सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमची 9 विमानं स्टेडियमवर थरारक स्टंट करताना दिसली. या काळात या विमानांनी अनेक फॉर्मेशन्स तयार केल्या. ही विमाने अनेक वेळा स्टेडियमवरून वेगवेगळ्या फॉर्मेशनसह जाताना दिसली. यावेळी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
रोहितचा आणखी एक विक्रम
वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम लढतीसाठी मैदानात उतरताच टीम इंडियाचा कर्णधार रोहितने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू रोहित शर्मा बनला आहे. रोहितने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यम्सनचा विक्रम त्याने रविवारी मोडीत काढला.
वनडे विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
597 - रोहित शर्मा (2023)
578 - केन विल्यम्सन (2019)
548 - माहेला जयवर्धने (2007)
539 - रिकी पाँटिंग (2007)
507 - ऍरॉन फिंच (2019)
वर्ल्डकपमध्ये विराटच किंग
- यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. 11 डावात विराटने 765 धावा केल्या आहेत. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडीत काढला. एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटने आपल्या नावावर केला. वर्ल्डकपमध्ये विराटने 11 डावात तब्बल 765 धावांचा पाऊस पाडला. त्याने 3 शतकासह 6 अर्धशतके ठोकताना 95.63 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात 700 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. 2003 विश्वचषकात सचिनने 11 सामन्यांमध्ये 673 धावा केल्या होत्या.
- फायनलमध्ये 54 धावांसह विराट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याने 42 डावात 1743 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकले. कोहलीच्या आता 37 डावांत 1795 धावा झाल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, त्याने 45 सामन्यात 2278 धावा केल्या आहेत.
विजेत्या ऑस्ट्रेलियन संघावर बक्षीसाचा वर्षाव
विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला 33.31 कोटी रुपये (चार दशलक्ष अमेरिकन डॉलर) मिळाले आहेत. याचबरोबर अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला 16.65 कोटी रुपये (दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) देण्यात आले आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 6.66 कोटी रुपये ( 800,000) मिळाले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला.
विराट कोहली मॅन ऑफ द सिरीज, शमीने घेतल्या सर्वाधिक 24 विकेट्स
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असले तरी संपूर्ण स्पर्धेत धावांची बरसात करणारा विराट मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने 54 धावा केल्या. मात्र, भारतीय संघ विजय होऊ शकला नसल्याने विराटच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. याशिवाय, पहिल्या काही सामन्यात बाहेर बसावे लागल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या मोहम्मद शमीने धुमाकुळ घालताना 24 बळी घेण्याची कामगिरी साकारली. यंदाच्या स्पर्धेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.