कांगारुंचा अवघ्या 34 चेंडूत विजय
नामिबियावरील एकतर्फी विजयासह सुपर-8 चे तिकिट कन्फर्म :
वृत्तसंस्था/ बार्बाडोस
बलाढ्या ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी व फलंदाजीत आपला दबदबा राखत दुबळ्या नामिबियाविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, अॅडम झाम्पा, जोस हॅजलवूड व मार्क स्टोइनिसच्या भेदक माऱ्यासमोर नामिबियाचा डाव 72 धावांत संपला. यानंतर विजयी लक्ष्य कांगारुंनी अवघ्या 34 चेंडूत पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सुपर-8 च्या फेरीसाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात जास्त चेंडू शिल्लक असताना हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियाला तिसऱ्या षटकात निकोलस डेव्हिनच्या (2) रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉन फ्रायलिंकच्या (1) रुपाने नामिबियाने दुसरी विकेट गमावली. यानंतर संघाची तिसरी विकेट पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मायकेल व्हॅन लिंगेनच्या रूपाने पडली, ज्याने 10 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा केल्या. फिरकीपटू झाम्पाच्या गोलंदाजीसमोर इतर नामिबियाच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. कर्णधार गेरार्ड इरास्मस वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. इरास्मसने 43 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. इरास्मसच्या या खेळीमुळे नामिबियाला 72 धावापर्यंत मजल मारता आली. फिरकीपटू झाम्पाने 12 धावांत 4 बळी घेतले. हॅजलवूड व स्टोनिसने प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
हेडची झंझावाती खेळी
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ट्रेव्हिस हेडच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना अवघ्या 34 चेंडूत जिंकला. 73 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडच्या या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या विकेटने ही भागीदारी संपुष्टात आली. वॉर्नरने 8 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करत संघाला 5.4 षटकात विजय मिळवून दिला. ट्रॅव्हिस हेडने 17 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. तर कर्णधार मिचेल मार्शने 9 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचा गटातील शेवटचा सामना दि. 16 जून रोजी स्कॉटलंडविरुद्ध होईल.
संक्षिप्त धावफलक : नामिबिया 17 षटकांत सर्वबाद 72 (गेरार्ड इरास्मस 36, मायकेल व्हॅन लिगेन 10, झाम्पा 12 धावांत 4 बळी, हॅजलवूड व स्टोइनिस प्रत्येकी दोन बळी). ऑस्ट्रेलिया 5.4 षटकांत 1 बाद 73 (वॉर्नर 20, ट्रेव्हिस हेड नाबाद 34, मिचेल मार्श नाबाद 18, डेव्हिड वीज 1 बळी).
ऑस्ट्रेलिया सुपर- 8 मध्ये
नामिबियाविरुद्ध विजयानंतर ऑस्ट्रेलियाने सुपर-8 फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे 3 सामन्यांत 6 गुण झाले आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. याआधी नुकतेच ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. आता ऑस्ट्रेलियाची नजर टी-20 विश्वचषक विजेतेपदावर आहे.
नामिबियाच्या कर्णधाराचा असाही अनोखा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 43 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान इरास्मसने आपले खाते उघडण्यासाठी तब्बल 17 चेंडू घेतले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने आपल्या पहिली धाव करण्यासाठी 17 चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेरहार्ड इरास्मसच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.