कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कांगारूंकडून विंडीजचा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश

06:58 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विंडीजचा केवळ 27 धावांत खुर्दा, कसोटी इतिहासातील दुसरी निचांकी धावसंख्या, मिचेल स्टार्कला दुहेरी मुकुट, 

Advertisement

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत अनेक विक्रम नोंदविले गेले. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 176 धावांनी दणदणीत पराभव केला. मिचेल स्टार्कने केवळ 9 धावांत 6 गडी बाद केले. तर स्कॉट बोलँडने हॅट्ट्रीक साधली. विंडीजचा दुसरा डाव केवळ 87 चेंडूत 27 धावांत ऑस्ट्रेलियाने गुंडाळला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे.

Advertisement

या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 225 धावा जमविल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 143 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 82 धावांची आघाडी पहिल्या डावात घेतल्यानंतर विंडीजच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 37 षटकात 121 धावांत आटोपला. विंडीजला निर्णायक विजयासाठी 203 धावांची जरुरी होती. पण मिचेल स्टार्क आणि बोलँड यांच्या भेदक आणि वेगवान माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव 14.3 षटकात केवळ 27 धावांत आटोपला. विंडीजच्या वेगवान खेळपट्टींवर दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी आपले वर्चस्व तिन्ही सामन्यात राखले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत विंडीजची फलंदाजी कमकुवत असल्याने त्यांना या मालिकेत एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. ही शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी जिंकली.

या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 6 बाद 99 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी 22 धावांची भर घालत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात वेबस्टरने 13, हेडने 16, स्टार्कने नाबाद 11 तर कॅमरुन ग्रीनने 6 चौकारांसह 42 तसेच उस्मान ख्वाजाने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. विंडीजच्या अल्झारी जोसेफने 27 धावंत 5 तर शमार जोसेफने 34 धावांत 4 आणि ग्रिव्हेसने 1 गडी बाद केला. विंडीजला निर्णायक विजयासाठी ऑस्ट्रेलियाकडून 204 धावांचे आव्हान मिळाले.

स्टार्क, बोलँडची दहशत

मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड यांनी आपल्या तुफानी गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला केवळ 27 धावांत उखडले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे. 1955 साली म्हणजेच 70 वर्षांपूर्वी इंग्लंडने ऑकलंडच्या कसोटीत न्यूझीलंडला 26 धावांत गुंडाळले होते. न्यूझीलंडचा हा विश्वविक्रम मात्र अद्याप अबाधित राहिला आहे. विंडीजच्या दुसऱ्या डावात 7 फलंदाजांना खातेही उघडता आलेले नाही. स्टार्कने आपल्या गोलंदाजीतील पहिल्या 15 चेंडूमध्ये विंडीजचे 5 गडी बाद केले. 100 व्या कसोटीत खेळणाऱ्या स्टार्कची एका डावात 5 गडी बाद करण्याची ही 15 वे खेप आहे. सबिना पार्कच्या मैदानावर ही शेवटची कसोटी पहिल्यांदाच दिवसरात्रीची खेळविण्यात आली होती. मिचेल स्टार्कने आपल्या 100 व्या कसोटीमध्ये 400 बळींचा टप्पाही गाठला.

विंडीजच्या दुसऱ्या डावातील पहिले षटक टाकताना स्टार्कने पहिल्याच चेंडूवर कॅम्पबेलला बदली खेळाडू इंग्लीसकरवी झेलबाद केले. त्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने अँडर्सनला खाते उघडण्यापूर्वी पायचित केले आणि शेवटच्या चेंडूवर ब्रेन्डॉन किंगचा त्रिफळा उडविला. विंडीजची यावेळी स्थिती 3 बाद 0 अशी होती. स्टार्कने आपल्या पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लुईसला पायचीत केले. त्याने 4 धावा जमविल्या. त्यानंतर स्टार्कने शाय होपला 2 धावांवर पायचीत केले. विंडीजचा निम्मा संघ 27 चेंडूत केवळ 7 धावांत तंबूत परतला होता. हॅजलवूडने कर्णधार चेसला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. बोलँडने आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ग्रिव्हेसला वेबस्टरकरवी झेलबाद केले. त्याने 24 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. विंडीजच्या दुसऱ्या डावात दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. बोलँडने यानंतर शमार जोसेफला दुसऱ्या चेंडूवर पायचीत केले आणि तिसऱ्या चेंडूवर वेरीकेनचा त्रिफळा उडविला. स्टार्कने सील्सचा त्रिफळा उडवून विंडीजला 14.3 षटकात केवळ 27 धावांत उखडले. स्टार्कने 9 धावांच्या मोबदल्यात 6 गडी बाद केले तर बोलँडने केवळ 2 धावांत 3 गडी बाद करत हॅट्ट्रीक साधली. हॅजलवूडने 10 धावांत 1 बळी मिळविला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिली कसोटी 159 धावांनी तर दुसरी कसोटी 133 धावांनी जिंकली होती. ऑस्ट्रेलियाने विंडीजचा एकतर्फी पराभव करत फ्रँक वॉरेल चषकावर आपले नाव कोरले.

संक्षिप्त धावफलक :  ऑस्ट्रेलिया प. डाव 225, विंडीज प. डाव 143, ऑस्ट्रेलिया दु. डाव 37 षटकात सर्वबाद 121 (ग्रीन 42, ख्वाजा 14, हेड 16, वेबस्टर 13, स्टार्क नाबाद 11, अवांतर 10, अल्झारी जोसेफ 5-27, शमार जोसेफ 4-34, ग्रीव्हेस 1-19), विंडीज दु. डाव 14.3 षटकात सर्वबाद 27 (ग्रीव्हेस 11, स्टार्क 6-9, बोलँड 3-2, हॅजलवूड 1-10)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article