कांगारुंचा जोरदार पलटवार
द.आफ्रिका 138 धावांत ऑलआऊट : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : पॅट कमिन्सचे 28 धावांत 6 बळी, हेजलवूड, स्टार्कही चमकले : आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली
वृत्तसंस्था/लंडन
जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेचे केंद्रबिंदू ठरलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पहिल्याच दिवशी थरार शिगेला पोहोचला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पहिल्या दिवशी तब्बल 14 बळी पडले, ज्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी ‘कर्दनकाळ‘ ठरली आहे. दुसऱ्या दिवशीही लॉर्ड्सवर गोलंदाजांचा वरचष्मा पहायला मिळला अन् आफ्रिकेचा पहिला डाव 57 षटकांत 138 धावांत आटोपला. पॅट कमिन्सच्या (28 धावांत 6 बळी) भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी नांगी टाकल्याचे पहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा कांगारुंनी दुसऱ्या डावात खेळताना 12 षटकांत 2 गडी गमावत 32 धावा केल्या होत्या. लाबुशेन 16 तर स्मिथ 4 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी 212 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघ फलंदाजीसाठी आला. मात्र पहिल्याच दिवशी आफ्रिकेला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. मिचेल स्टार्कने एडन मार्करम आणि रायन रिकेल्टनला (16 धावा) देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर, वियान मुल्डरला (6 धावा) कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. तसेच धोकादायक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सही स्वस्तात बाद झाल्याने आफ्रिकेची पहिल्या दिवशी 4 बाद 43 अशी स्थिती झाली होती.
कमिन्सचा जलवा
याच धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशी आफ्रिकेने आपला पहिला डाव पुढे सुरु केला. कर्णधार टेम्बा बवुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी पॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेचे फलंदाज सपशेल ढेपाळले. टेम्बा बवुमाला कमिन्सने माघारी धाडले. त्याने 84 चेंडूचा सामना करत 36 धावा केल्या. तर काइल व्हेरेन जास्त वेळ टिकला नाही. त्याला 13 धावांवर कमिन्सने बाद केले. एकाबाजूने विकेट जात असताना बेडिंगहॅमने 111 चेंडूत 6 चौकारासह सर्वाधिक 45 धावांची खेळी साकारली. बेडिंगहॅमच्या या खेळीमुळे आफ्रिकेचे शतक फलकावर लागले. त्याचा अडथळा कमिन्सने दूर केला. यानंतर मात्र आफ्रिकेचा एकही खेळाडू तग धरु शकला नाही. मार्को यान्सेन 0, केशव महाराज 7, कागिसो रबाडा 1 धावा करुन माघारी परतले. आफ्रिकेचा पहिला डाव 57.1 षटकांत 138 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने 19 ओव्हरमध्ये 28 धावा देत सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. यासोबत त्याने टेस्ट करियरमध्ये 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तसेच मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या. जोश हेजलवूडला 1 विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक (चहापानापर्यंत)
ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 212 ,द. आफ्रिका पहिला डाव 57.1 षटकांत सर्वबाद 138(रिकेल्टन 16, मार्करम 0, मुल्डर 6, टेंबा बवुमा 36, स्टब्ज 2, बेडिंगहॅम 45, वेरेन 13, यान्सेन 0, केशव महाराज 7, रबाडा 1, पॅट कमिन्स 28 धावांत 6 बळी, स्टार्क 2 बळी, हेजलवूड 1 बळी). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 12 षटकांत 2 बाद 32 (लाबुशेन खेळत आहे 16, उस्मान ख्वाजा 6, कॅमरुन ग्रीन 0, स्मिथ खेळत आहे 4, रबाडा 15 धावांत 2 बळी).
कमिन्सचे कसोटीत 300 बळी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने शानदार गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 गडी बाद करण्याचा माईलस्टोन गाठला आहे. हा टप्पा त्याने आपल्या 68 व्या कसोटी सामन्यात करून दाखवला आहे. यादरम्यान त्याने 14 वेळेस एकाच डावात 5 गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियासाठी 300 गडी बाद करणारा तो चौथा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.
कमिन्सचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी
द.आफ्रिकेविरुद्ध लढतीत ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने 6 बळी घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. कमिन्सने यंदाच्या हंगामात 79 बळी मिळवले आहेत. बुमराहच्या नावे या हंगामात 77 गडी बाद करण्याची नोंद आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 77 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.