कांगारूंचा टीम इंडियावर दणदणीत विजय
दुसरी टी-20 : भारतीय संघाचा फ्लॉप शो : सामनावीर हेजलवूडचे 3 बळी : अभिषेक शर्माचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत दुसऱ्या सामन्यातील विजयासह कांगारुंनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव हेजलवूडच्या भेदक माऱ्यासमोर 125 धावांत आटोपला. यानंतर विजयाचे सोपे लक्ष्य ऑसी संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. आता, उभय संघातील तिसरा सामना दि. 2 रोजी होबार्ट येथे होईल.
भारताने दिलेल्या 126 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने झंझावाती सुरुवात केली आणि फक्त 13.2 षटकांत विजय मिळवला. कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मार्श 26 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारासह 46 धावा करून बाद झाला. हेड 15 चेंडूत 28 धावा करून माघारी परतला. ही जोडी बाद झाल्यानंतर जोश इंग्लिस (20), टिम डेव्हिड (1), मिचेल ओवेन (14) आणि मॅथ्यू शॉर्ट (0) यांच्याही विकेट्स भारताने घेतल्या. जसप्रीत बुमराहने एका षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. शेवटी मार्कस स्टोइनिसने 6 चेंडूत 6 धावा करत 13.2 षटकांत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, धावांचा बचाव करण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना अवघ्या 80 चेंडूत आणि 4 गडी राखून जिंकला. भारताकडून जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
अभिषेक वगळता भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
प्रारंभी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने सुरुवातीपासूनच कहर माजवला. त्याने पहिल्या सहा षटकांतच तीन विकेट घेतल्या, ज्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. सूर्यकुमारला त्याने अशा चेंडूवर बाद केले की ज्याला खेळणे जवळपास अशक्यच होते. तर शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांनी घाईघाईत फटकेबाजी करून आपली विकेट गमावली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनलाही फारसे काही करता आले नाही. 2 धावा करुन तो माघारी परतला. दुसरीकडे, अक्षर पटेलही 7 धावा करुन स्वस्तात परतला. अक्षर बाद झाल्यानंतर टीम इंडियाची 5 बाद 50 अशी बिकट स्थिती झाली होती.
या बिकट परिस्थितीत अभिषेक शर्माने जोरदार टोलेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे त्याचे पहिलेच तर एकूण टी-20 कारकिर्दीतील सहावे अर्धशतक ठरले. त्याने 37 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची शानदार खेळी साकारली. याशिवाय, हर्षित राणाने 33 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी साकारली. हे दोघे वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने टीम इंडियाचा डाव 18.4 षटकांत 125 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 13 धावांत 3 गडी बाद केले. याशिवाय, बार्टलेट, एलिस यांनी प्रत्येकी दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक
भारत 18.4 षटकांत सर्वबाद 125 (अभिषेक शर्मा 37 चेंडूत 68, हर्षित राणा 33 चेंडूत 35, अक्षर पटेल 7, शुभमन गिल 5, सूर्या 1, शिवम दुबे 4, हेजलवूड 3 बळी, बार्टलेट आणि एलिस प्रत्येकी 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 13.2 षटकांत 6 बाद 126 (मिचेल मार्श 26 चेंडूत 46, टॅव्हिस हेड 15 चेंडूत 28, इंग्लिस 20, बुमराह, चक्रवर्ती आणि कुलदीप यादव प्रत्येकी 2 बळी).
मेलबर्नमधील 17 वर्षांची विजयी परंपरा खंडित
भारतीय क्रिकेट संघाने मेलबर्नमधील एमसीजी येथे एकूण सहा टी-20 सामने खेळले होते. टीम इंडियाने त्यापैकी चार सामने जिंकले होते आणि या ठिकाणी फक्त एकच सामना गमावला होता. हा पराभव 2008 मध्ये झाला होता. तेव्हापासून, भारतीय संघाने एकही सामना येथे गमावला नव्हता. 17 वर्षांनंतर, भारतीय संघाची विजयी मालिका खंडित झाली आहे.
सलग 10 विजयानंतर टीम इंडिया पराभूत
भारतीय टी-20 संघ सलग 10 सामने जिंकल्यानंतर पराभूत झाला आहे. मेलबर्न येथे झालेल्या लढतीत शुक्रवारी टीम इंडियाला कांगारुंनी पराभवाचा धक्का दिला. दरम्यान, भारताचा शेवटचा पराभव या वर्षी 28 जानेवारी रोजी झाला होता, जेव्हा इंग्लंडने भारताचा 26 धावांनी पराभव केला होता.