For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांगारुंचा ‘मॅड मॅक्स’

06:01 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
कांगारुंचा ‘मॅड मॅक्स’
Advertisement

Advertisement

 ऑस्ट्रेलियानं विश्वचषक जिंकल्यानंतर भलेही भारताविरुद्ध जबरदस्त शतकी खेळी केलेल्या ट्रेव्हिस हेडचा गाजावाजा झालेला असेल, पण कांगारुंची उपांत्य फेरीची वाट निर्धोक करण्यात मोलाचा वाटा राहिला तो त्यांचा तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा...त्या भरात त्यानं अनेक विक्रम पायदळी तुडवले, ‘मॅड मॅक्स’ ही उपाधी सार्थ करून दाखविली...

वानखेडेवर उष्ण वातावरणात संपूर्ण 50 षटकं उन्हात क्षेत्ररक्षण...शिवाय वेगवेगळ्या स्पेलमध्ये 10 षटकं गोलंदाजी...त्यानंतर दीड तास बसून राहिल्यावर फलंदाजीला उतरण्याची वेळ...या पार्श्वभूमीवर आधीच शरीर गारठल्यागत परिस्थिती झाली होती. डावाच्या मध्यास पोहोचेपर्यंत पाठ आखडली...शरीराचे वेगवेगळे अवयव तीव्र कुरकुर करू लागले. उजव्या पायात पेटके येण्याची जी लक्षणं सुरुवातीला दिसू लागली होती ती खरी ठरली. हळूहळू ही समस्या वाढीस लागत साऱ्या शरीरातच पेटके जाणवू लागले, सारं अंग ठणकू लागलं...डाव पुढं सरकू लागला तसतशा धावण्यावर प्रचंड मर्यादा येऊ लागल्या. मग एक वेळ एकाच पायावर भार टाकून खेळण्याचा प्रसंग...विजयासाठी 75 धावांची आवश्यकता असताना फटका मारण्यासाठी पाय हलवणं देखील कठीण बनलं अन् लक्ष्य 55 धावांच्या अंतरावर असताना तर मैदानावरच कोसळण्याची पाळी...तरीही या शारीरिक त्रासांवर मात करून धावफलकावर द्वितशकाची नोंद आणि संघाला बहुमोल विजय मिळवून देण्यात यश...

Advertisement

ही खरं तर एखाद्या क्रीडाक्षेत्रावर आधारित चित्रपटाला शोभेलशी कहाणी. परंतु यंदाच्या विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं दर्शन घडविलं ते याच विश्वास बसण्यास कठीण अशा असाधारण कामगिरीचं...त्यानं घेतलेल्या प्रत्येक धावेला त्या दिवशी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली अन् महान सचिन तेंडुलकरपासून रिकी पाँटिंगपर्यंत साऱ्यांना ती एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत महान खेळी असल्याचं वाटलं ते उगाच नव्हे...मॅक्सवेलनं अशाही अवस्थेत संघाला बाहेर काढलं ते 7 बाद 91 या विलक्षण अडचणीच्या परिस्थितीतून. शरीर साथ देत नसतानाही हात नि डोळे यांच्यातील अपवादात्मक समन्वय अन् जवळजवळ परिपूर्ण पद्धतीनं चेंडू फटकावण्याची क्षमता यांच्या जोरावर मॅक्सवेलनं ही मोहीम फत्ते केली...

पण 14 ऑक्टोबर, 1988 रोजी जन्मलेला ग्लेन मॅक्सवेल आहेच मुळी तसा...एकहाती सामना फिरविण्याची ताकद बाळगणारा, तुफानावत खेळणारा, ‘रिव्हर्स स्वीप’वर षटकार ठोकण्यापासून अनेक चित्रविचित्र फटके हाणून गोलंदाजांना जेरीस आणू शकणारा, डी व्हिलियर्सप्रमाणं ‘360 डिग्री’ फलंदाजी करू शकणारा, पण कधी खेळेल अन् कधी पॅव्हेलियनमध्ये परतेल याचा नेम देखील नसलेला...त्यामुळंच त्याच्या कारकिर्दीत सातत्याचा अभाव राहिलेला अन् कसोटींहून जास्त एकदिवसीय नि ‘टी20’ सामन्यांत गाजलेला...

अनेकांच्या मते, मॅक्सवेलची गोल्फ नि टेनिस खेळण्याची आवड त्याच्या हात व डोळ्यांमधील उत्कृष्ट समन्वयास कारणीभूत. त्यामुळंच त्याला अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही ‘फूटवर्क’शिवाय खेळणं शक्य झालं...अनेकांना माहीत नसेल, पण मॅक्सवेल हा किशोरवयात एक चांगला टेनिसपटू राहिला होता. अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या हातांच्या दिसलेल्या मुक्त हालचाली हा त्याचाच परिपाक. शिवाय गोल्फमध्येही चेंडू हाणताना पाय न हलविता हात बऱ्याच पाठीमागून पुढं आणावे लागतात. त्यामुळंच एका जागी स्थिर राहून किमान हालचाली करत तो त्या खेळीत 10 उत्तुंग षटकार खेचू शकला...

ग्लेन मॅक्सवेल हा क्रिकेटमधला आंतरराष्ट्रीय सुपरस्टार बनण्याआधी आणि 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याच्या काही महिने पूर्वी त्याची ‘आयपीएल’साठी ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’नं निवड केली होती. पण त्या वर्षी फक्त दोनच सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली...त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब (2014 पासून) अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2021 पासून) या संघांतून खेळताना त्याचा प्रवास जसा हेलकावे खात झालाय तसाच तो ऑस्ट्रेलियातर्फे खेळतानाही राहिलाय....

मॅक्सवेल हा केवळ मैदानातच नव्हे तर बाहेरही ‘फ्रीक’ या विशेषणास शोभून दिसणारा. गेल्या वर्षी पार्टीचा आनंद घेत असताना आपला मित्र नि माजी शिक्षकाचा पाठलाग करण्याच्या भरात त्यानं डावा पाया मोडून घेतला. त्यामुळं त्याला या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या भारतातील कसोटी मालिकेला मुकावं लागलं. मात्र ‘आयपीएल’साठी वेळेत सावरून मॅक्सवेलनं त्या स्पर्धेतील 14 सामन्यांत पाच अर्धशतकांसह 400 धावा जमवल्या...मग विश्वचषक चालू असताना अहमदाबादमध्ये  गोल्फ खेळण्यास जाणं त्याच्या अंगलट आलं. गोल्फ कारच्या पाठीमागं बसलेला असताना घसरून पडल्यानं पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आलं नाही...

मॅक्सवेल हे नाव मैदानातील पराक्रमांमुळं विलक्षण गाजत राहिलेलं असलं, तरी हा प्रवास त्याच्यासाठी सोपा मुळीच राहिलेला नाही. 2018 मध्ये त्याला कसा नैराश्याचा सामना करावा लागला होता ते खुद्द त्यानंच सांगितलंय. त्या चक्रव्युहातून सुटका करून घेण्यासाठी त्याला तज्ञांची मदत घ्यावी लागली होती...गेल्या काही वर्षांत ग्लेन मॅक्सवेलनं त्याच्या मनातील संकटांवरही मात केलीय, दीर्घकाळची जोडीदार विनी रमणशी लग्न केल्यानंतर त्याच्या जीवनातील आनंदात भर पडलीय अन् पितृत्व त्याला जीवनाच्या कक्षा क्रिकेटच्या पलीकडे विस्तारण्यास मदत करून गेलंय !

‘टी20’तला धडाका...

? गुवाहाटीतील तिसऱ्या ‘टी20’ लढतीत ग्लेन मॅक्सवेलनं 8 चौकार नि 8 षटकारांची बरसात करत झळकावलेलं शतक ऑस्ट्रेलियाला भारतावर पाच गडी राखून विजयच मिळवून देऊन गेलं नाही, तर त्यासरशी कांगारुंच्या या विलक्षण धडाकेबाज फलंदाजानं रोहित शर्माच्या ‘टी20’मधील सर्वाधिक चार शतकांच्या विक्रमाशीही बरोबरी केली...

? मॅक्सवेलनं या चारपैकी 3 शतकं लक्ष्याचा पाठलाग करताना फटकावलीत हे महत्त्वाचं. ‘टी20’मध्ये कोणत्याही फलंदाजाला दुसऱ्या डावात अशी कामगिरी करता आलेली नाही. ही तिन्ही शतकं चौथ्या वा त्याहून खालच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करताना नोंदवली गेलीत. हाही विक्रमच...

? मॅक्सवेल आपल्या 100 व्या ‘टी20’ आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरलाय...त्याला या शतकासाठी लागले अवघे 47 चेंडू. त्यानं ‘टी20’मध्ये सर्वांत वेगवान शतक झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या पंक्तीत अॅरॉन फिंच (2013 साली इंग्लंडविरुद्ध) व जोश इंग्लिस (यंदा भारताविरुद्ध) यांच्यासमवेत स्थान मिळविलंय...

विश्वचषकातील अजोड द्विशतक...

? मॅक्सवेलनं विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांसह काढलेल्या नाबाद 201 धावांची छाप ही कधी पुसली जाणारी नाहीये. एकदिवसीय सामन्यांमध्ये एखाद्या ऑस्ट्रेलियन फलंदाजानं काढलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या...

? मॅक्सवेल हा वनडेत द्विशतक करणारा एकंदरित नववा अन् पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज...

? मात्र वनडे विश्वचषकाचा विचार करता ग्लेन मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा केवळ तिसरा फलंदाज. यापूर्वी मार्टिन गप्टिल (2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध) आणि ख्रिस गेल (2015 सालीच झिम्बाब्वेविरुद्ध) या दोनच फलंदाजांना असा प्रताप गाजविता आलाय...

? तो एकदिवसीय लढतींत सर्वांत वेगानं द्विशतक फटकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरलाय. त्यानं 128 चेंडूत हा टप्पा गाठला. अग्रक्रमांकावर आहे तो भारताचा इशान किशन (126 चेंडू)...

विश्वचषकातील अन्य विविध भीमपराक्रम...

? मॅक्सवेलचं द्विशतक ही विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना एखाद्या फलंदाजानं उभारलेली सर्वोच्च धावसंख्या...

? शिवाय वनडेमध्ये द्विशतक फटकावणारा मॅक्सवेल हा पहिला सलामीवीर नसलेला फलंदाज...

? दुसऱ्या डावात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा विक्रमही मॅक्सवेलच्या नावावर जमा झालाय. पाकिस्तानचा फलंदाज फखर झमाननं 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविऊद्ध काढलेला 193 धावांना त्यानं मागं टाकलं...

? ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध पॅट कमिन्ससह जोडलेल्या धावा ही एकदिवसीय सामन्यात आठव्या किंवा त्याहून खालील यष्टीसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी. या दोघांनी मिळून 202 धावांची भर टाकली...

? शिवाय मॅक्सवेलनं विश्वचषकात सहाव्या क्रमांकावर येऊन सर्वोच्च धावसंख्या नोंदविण्याचा पराक्रमही केला. त्यानं मागं टाकली कपिल देवनं केलेली दिग्गज कामगिरी (झिम्बाब्वेविऊद्ध 1983 च्या विश्वचषकात नाबाद 175 धावा)....

? त्यापूर्वी मॅक्सवेलनं नेदरलँड्सविऊद्ध इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळविलं होतं ते विश्वचषकातील सर्वांत जलद शतक झळकावून. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमनं याच स्पर्धेत श्रीलंकेविऊद्ध 49 चेंडूंत शतक नोंदवून रचलेला विक्रम त्यानं टिकू दिला नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाजानं 40 चेंडूंत फटकावलेलं शतक हे एकंदरित एकदिवसीय क्रिकेटमधील चौथं सर्वांत जलद...

ग्लेन मॅक्सवेलची फलंदाजी...

प्रकार सामने   डाव      नाबाद   धावा    सर्वोच्च  सरासरी शतकं    द्विशतकं         अर्धशतकं

कसोटी          7        14        1         339       104       26.08     1         -         -

वनडे  138       127       17        3895      201       35.41      4         1         23

टी20   100       92        15        2275     145       29.55     4         -         10

आयपीएल      124       120       17        2719      95        26.4      -         -         18

राजू प्रभू

‘मॉडर्न पेंटॅथलॉन’

‘मॉडर्न पेंटॅथलॉन’ हे नाव अलीकडे प्रकाशात आले ते नुकत्याच झालेल्या ‘राष्ट्रीय खेळां’मुळे. पण हा प्रकार बऱ्याच काळापासून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहे...मूळ ‘पेंटॅथलॉन’मध्ये धावणे, उडी मारणे, भालाफेक, थाळीफेक नि कुस्ती यांचा समावेश असायचा आणि प्राचीन ग्रीसमधील खेळांचा कळस त्याने गाठला जायचा. 1912 साली स्टॉकहोम इथं झालेल्या ऑलिम्पिक खेळांत पिएरे दी कुबर्तिन यांनी त्याची आधुनिक आवृत्ती सादर केली...

? ‘मॉडर्न पेंटॅथलॉन’मध्ये पोहणे, तलवारबाजी, घोडेस्वारी (शो जंपिंग), पिस्तूलाच्या साहाय्याने नेमबाजी आणि धावणे या पाच वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश होतो. अलीकडील

ऑलिम्पिक खेळांमध्ये शेवटचे दोन प्रकार एकत्र केले गेले असून त्याला ‘लेसर रन’ म्हणून ओळखले जाते...

? ‘मॉडर्न पेंटॅथलॉन’च्या जलतरण, तलवारबाजी आणि ‘शो जंपिंग’ या पहिल्या तीन स्पर्धांमध्ये खेळाडू त्यांच्या कामगिरीद्वारे गुण मिळवतात. समाप्ती ज्या ‘लेसर रन’ने होते त्यावेळी हे गुण जमेस धरले जातात. ‘लेसर रन’मध्ये 3.2 किलोमीटरांची क्रॉस कंट्री दौड नि ‘लेसर पिस्तूल शूटिंग’च्या चार फेऱ्या यांचा समावेश असतो...

? मूलत: पाच दिवसांच्या कालावधीत, दररोज एक स्पर्धा या पद्धतीने आयोजित केला जाणारा हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये आता फक्त दोन दिवसांत होतो. पहिल्या दिवशी तलवारबाजीच्या ‘रँकिंग’ फेरीचा समावेश असतो. त्यात खेळाडू साखळी फेरीत एकमेकांचा सामना करतात...

? ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवसाची सुऊवात 200 मीटर फ्रीस्टाईल पोहण्याने होते. त्यानंतर तलवारबाजीची बोनस फेरी होते, ज्यामध्ये खेळाडू एकदा पराभूत झाल्यानंतर बाहेर पडतात. पुढील स्पर्धा ही ‘शो जंपिंग’ची असते. ज्यात खेळाडूंना अपरिचित घोड्यांवर स्वार होऊन 12 अडथळे पार करावे लागतात...‘लेसर रन’ने समाप्ती, ज्यात सीमारेषा प्रथम पार करणारा खेळाडू सुवर्णपदक जिंकून जातो...

? ‘मॉडर्न पेंटॅथलॉन’ने ऑलिम्पिकमध्ये प्रथम पाऊल ठेवले ते 1912 मध्ये वैयक्तिक क्रीडाप्रकार म्हणून, तर हेलसिंकी येथे 1952 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकपासून त्यात सांघिक विभागाची भर पडली...1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये मोठे बदल करताना सांघिक स्पर्धा वगळण्यात आली अन् संपूर्ण प्रकार पाचऐवजी एकाच दिवशी घेण्यात आला...

? सिडनी, ऑस्ट्रेलिया इथं 2000 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठीची मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आयोजित केली गेली...तर 2012 च्या लंडन  ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी व धावणे हे प्रकार एकत्र करण्यात आले. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी नेमबाजीकरिता प्रथमच लीड-फायरिंग पिस्तूलऐवजी ‘लेसर गन्स’चा उपयोग करण्यात आला...

? 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा ‘रँकिंग राऊंड’ सादर करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी इतर चार प्रकारांसोबत तलवारबाजीची बोनस फेरी घेण्यात आली...

‘गोव्याचा गोल्डन बॉय‘ बाबू गांवकर

सामान्य कुटुंबातील बाबूचे ऐतिहासिक यश, क्रीडा क्षेत्रात कारकीर्द  घडविण्याचे स्वप्न

बाबूला लहानपणापासून धावण्याची सवय होती. विद्यालयात जाताना किंवा गावातून नेत्रावळी परिसरात जाण्यासाठी तो धावतच जायचा. घरापासून साधारण 3-4 किलोमीटर दूर डोंगरावर वाटमार्गी देवस्थान आहे. तेथे तो धावत जाऊन परत यायचा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने प्रथमच गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व करुन सुवर्णपदक पटकावले व तो प्रकाशझोतात आला.

एका रात्रीत तो स्टार झाला’ असे क्वचित काही व्यक्तीबद्दल घडत असते. मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळ प्रकारातून गोव्याचा बाबू अर्जून गांवकर हा खेळाडू असाच प्रकाशझोतात आला. गोव्यात नुकत्याच झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 22 वर्षीय बाबू गांवकरने गोव्यासाठी पहिलेच सुवर्णपदक पटकावून गौरवशाली व ऐतिहासिक कामगिरी केली आहे. योगायोग असा की, आपल्या वाढदिनीच त्याने या स्पर्धेत 1 सुवर्ण व 1 रौप्यपदक पटकावले.

काठमांडू-नेपाळ येथे 25 व 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करुन देशाला सुवर्णपदक पटकावून आणखीन एक पराक्रम केला आहे.

 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉन

या क्रीडा प्रकाराचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. गोव्यासाठीही हा नवीन खेळ प्रकार आहे. यात धावणे, स्विमिंग, हॉर्स रायडींग (घोडेस्वारी), फेन्सींग (तलवारबाजी) व लेसर रन शूटींग असे पाच प्रकार असतात. बाबूने लेसर रन शूटींगमध्ये भाग घेऊन सुवर्णपदक तर लेसर रन मिश्र रिलेत सिता गोसावी हिच्याबरोबर रौप्यपदक प्राप्त केले. तो उत्कृष्ट धावपटू होता परंतु लेसर शूटींग हा त्याच्यासाठी नवीन प्रकार असल्याने तो रात्री उशिरापर्यंत एकटाच सराव करायचा. लेसर रन शूटींग प्रकारात 600 मी. धावणे व नंतर 10 मी. अंतरावरुन 50 सेकंद लेसर गन शूटींग करणे. असे पाच वेळा धावणे व चार वेळा शूटींग करणे, असा हा क्रीडा प्रकार आहे. त्यामुळे एकूण 3000 मी. धावावे लागते. भविष्यात या खेळातील इतर प्रकारही शिकण्याची त्याची इच्छा आहे.

श्रेय आई-वडील व प्रशिक्षकांना

सांगे तालुक्यातील वर्गण-नेत्रावळी अशा ग्रामीण भागातील  कला शाखेचा पदवीधर असलेल्या  बाबू गांवकरने यशाचे श्रेय आपली आई अपर्णा, वडील अर्जुन, कुटुंबीय तसेच प्रशिक्षकांना दिले आहे. प्रशिक्षक सावियो लैतांव, किर्तन वैज, वीरेंद्र माजिक तसेच मॉडर्न पेंटॅथलॉनचे

नोडल अधिकारी निलेश नाईक यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेचे अध्यक्ष संजीव गडकर व भारतीय मॉडर्न

पेंटॅथलॉन महासंघाच्या अध्यक्ष संध्या पालयेकर यांचे त्याला पाठबळ मिळाले. बाबूला लहानपणापासून धावण्याची सवय होती. विद्यालयात जाताना किंवा गावातून नेत्रावळी परिसरात जाण्यासाठी तो धावतच जायचा. घरापासून साधारण 3-4 किलोमीटर दूर डोंगरावर वाटमार्गी देवस्थान आहे. तेथे तो धावत जाऊन परत यायचा. गोव्यात होणाऱ्या धावण्याच्या, मॅरेथॉन तसेच महाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी व्हायचा. त्यात त्याने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने प्रथमच गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व करुन सुवर्णपदक पटकावले व तो प्रकाशझोतात आला. राज्यात तसेच देशात त्याची कीर्ती झाली आहे. मैदानावर उतरताना आपण देवाचे स्मरण करतो व जिंकण्याच्या उद्देशानेच धावतो, असे बाबू सांगतो.

गोव्याला राष्ट्रीय स्पर्धेत पहिलेच सुवर्णपदक मिळवून दिलेल्या बाबू गांवकर तसेच या खेळात इतर 7 पदके मिळवून दिलेल्या खेळाडूंची नेत्रावळी-सांगे गावातून त्यांच्या घरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. सामान्य कुटुंबातील एका मुलाने केलेली ही अलौकीक कामगिरी आहे. आज सगळीकडे बाबूच्या नावाची चर्चा होत असून त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्याचे स्वप्न

25 व 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन नेपाळ ग्लोबल लेसर रन सिटी टूर स्पर्धेत त्याने देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिल्याने त्याच्या यशात आणखीन एक तुरा खोवला गेला आहे. यानंतर विश्व अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्यातही देशाचे प्रतिनिधीत्व करुन पदक मिळवायचे त्याचे ध्येय आहे. भविष्यात या खेळात कारकीर्द घडविण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याची मेहनत घेण्याची क्षमता, चिकाटी व जिद्द यामुळे त्याला ते शक्य आहे. बाबूची ही अलौकीक व ऐतिहासिक कामगिरी इतर खेळाडूंसाठी प्रेरणा देणारी आहे.

    नरेश गावणेकर

Advertisement
Tags :

.