वनडे वर्ल्डकपनंतर कांगांरुचा प्रथमच पराभव
तिसऱ्या वनडेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा रोखला विजयरथ : यजमान संघ डकवर्थ लुईस नियमानुसार 46 धावांनी विजयी
वृत्तसंस्था/ चेस्टर ली स्ट्रीट (इंग्लंड)
वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर पहिला पराभव पत्करावा लागला आहे. मंगळवारी रात्री ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडकडून डीएलएस 46 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लिश संघाने 5 सामन्यांच्या असे 1-2 ने पुनरागमन केले आहे. मालिकेतील चौथा सामना 27 सप्टेंबर रोजी लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषक 2023 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने कांगारूंचा पराभव केला होता. त्यानंतर ऑसी संघाने वनडे क्रिकेटमध्ये सलग 14 सामने जिंकले होते, पण इंग्लंडने तिसऱ्या वनडेत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला आहे.
चेस्टर ली स्ट्रीट येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचा व्यत्यय झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत 7 गडी गमावत 304 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने 37.4 षटकांत 4 गडी गमावून 254 धावा केल्या होत्या तेव्हा पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. शेवटी, डीआरएसनुसार, इंग्लंडला 46 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. हॅरी ब्रुकला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. ब्रूकने 94 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या.
कांगांरुची त्रिशतकी मजल
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात विशेष झाली नाही. संघाने 50 धावांतच सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार मिचेल मार्श 38 चेंडूत 24 धावा करून बाद झाला तर मॅथ्यू शॉर्ट 14 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरने शॉर्टला बाद करून कांगारू संघाला पहिला धक्का दिला. यानंतर ब्रायडन कार्सने कॅप्टन मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ व कॅमरुन ग्रीन यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी साकारली. बचावत्मक खेळणाऱ्या स्मिथने अर्धशतकी खेळी साकारताना 82 चेंडूत 5 चौकारासह 60 धावा केल्या. ग्रीनने 42 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ग्रीन बाद झाल्यानंतर लाबुशेनला भोपळाही फोडता आला नाही. अर्धशतकानंतर स्मिथही लगेचच बाद झाला. यानंतर अॅलेक्स केरी व ग्लेन मॅक्सवेल जोडीने ऑसी संघाचा धावफलक हलता ठेवला. केरीने 65 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी साकारली, यामुळे ऑसी संघाला त्रिशतकी मजल मारता आली. केरीला मॅक्सवेलने 30 तर अॅरॉन हार्डीने 44 धावा करत मोलाची साथ दिली. सीन अॅबॉट 2 धावांवर नाबाद राहिला. ऑसी संघाने 50 षटकांत 7 बाद 304 धावा केल्या.
हॅरी ब्रुकचे नाबाद शतक
305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कने सलामीवीर फिल सॉल्टला भोपळाही फोडू दिला नाही तर बेन डकेटला वैयक्तिक 8 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सलामीचे दोन्ही फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार हॅरी ब्रुक व विल जॅक जोडीने संघाची धुरा सांभाळली. या जोडीने दीडशतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार हॅरी ब्रुकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले वनडे शतक साजरे करताना 94 चेंडूत 13 चौकार व 2 षटकारासह नाबाद 110 धावा केल्या. त्याला जॅकने 84 धावा करत चांगली साथ दिली. जॅकला ग्रीनने बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. यानंतर जेमी स्मिथ ग्रीनचा बळी ठरला. पुढे लियाम लिव्हिंगस्टोनने 20 चेंडूत नाबाद 33 धावा करत ब्रुकला साथ दिली. यावेळी इंग्लंडने 37.4 षटकांत 7 बाद 254 धावा केल्या. यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने पुढे खेळ होऊ शकला नाही. यामुळे सामन्याचा निकाल डीएलएस नियमानुसार लावण्यात आला. इंग्लंडने हा सामना 46 धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 7 बाद 304 (मिचेल मार्श 24, मॅथ्यू शॉर्ट 14, स्टीव्ह स्मिथ 60, कॅमरुन ग्रीन 42, अॅलेक्स केरी 77, अॅरॉन हार्डी 44, जोफ्रा आर्चर 2 बळी, विल जॅक, लिव्हिंगस्टोन, बेथेल व कार्स प्रत्येकी 1 बळी).
इंग्लंड 37.4 षटकांत 4 बाद 254 (विल जॅक 84, हॅरी ब्रुक नाबाद 110, स्मिथ 7, लिव्हिंगस्टोन नाबाद 33, मिचेल स्टार्क व कॅमरुन ग्रीन प्रत्येकी 2 बळी).
तब्बल साडेतीनशे दिवसानंतर कांगारु पराभूत
ऑस्ट्रेलियन संघ 2023 च्या वनडे विश्वचषकानंतर म्हणजेच जवळपास 348 दिवसानंतर प्रथमच वनडे सामन्यात पराभूत झाला. वनडे वर्ल्डकपनंतर ऑसी संघाने सातत्याने विजय मिळवताना सलग 14 विजय मिळवले होते, पण मंगळवारी इंग्लंडने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला आहे. गतवर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपमधील साखळी सामन्यात आफ्रिकेने ऑसी संघाला नमवले होते. त्यानंतर ऑसी संघाने वनडे क्रिकेटमध्ये सलग 14 सामने जिंकले होते. सलग वनडे सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सलग विजय मिळवणारे संघ
- ऑस्ट्रेलिया - 21 विजय (जानेवारी - मे 2003)
- ऑस्ट्रेलिया - 14 विजय (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024)
- श्रीलंका - 13 विजय (जून - ऑक्टोबर 2023)
- द.आफ्रिका - 12 विजय (फेब्रुवारी - ऑक्टोबर 2005)