पहिल्या कसोटीवर कांगारुंचे वर्चस्व
दुसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाकडे 217 धावांची आघाडी : न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या 179 धावांवर गुंडाळले
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
कॅमेरॉन ग्रीनचे नाबाद दीडशतक व फिरकीपटू नॅथन लियॉन (4 बळी) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 383 धावा केल्या. कांगारुंच्या भेदक माऱ्यासमोर यजमान न्यूझीलंडचा डाव 179 धावांवर आटोपला व ऑस्ट्रेलियाला 204 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली असून दिवसअखेरीस त्यांनी 8 षटकांत 2 गडी गमावत 13 धावा केल्या. ऑसी संघाकडे आता 217 धावांची भक्कम आघाडी असून उस्मान ख्वाजा 5 व नॅथन लियॉन 6 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने 9 बाद 279 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. शतकवीर ग्रीनने दुसऱ्या दिवशीही धमाकेदार खेळी साकारताना संघाला पावणे चारशेपर्यंत मजल मारुन दिली. ग्रीन व हॅजलवूड जोडीने 116 धावांची भागीदारी साकारली. ग्रीनने 275 चेंडूचा सामना करताना 23 चौकार व 5 षटकारासह नाबाद 174 धावा केल्या. हॅजलवूडने 4 चौकारासह 22 धावांचे योगदान दिले. हॅजलवूडला हेन्रीने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. कांगारुंनी पहिल्या डावात 115.1 षटकांत 383 धावा केल्या. किवीजकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 गडी बाद केले.
न्यूझीलंड 179 धावांवर ऑलआऊट, लियॉनचे 4 बळी
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या किवीज संघाची सुरुवात मात्र खराब झाली. डावातील पाचव्या षटकात सलामीवीर टॉम लॅथम 5 धावा काढून बाद झाला. यानंतर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर केन विल्यम्सन धावबाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. युवा रचिन रवींद्रलाही हॅजलवूडने बाद केले. विल यंग 9 तर डॅरेल मिचेल 11 धावा काढून स्वस्तात परतले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 13 चौकारासह 70 चेंडूत 71 धावा केल्या. ब्लंडेलने 33 तर मॅट हेन्रीने 42 धावांचे योगदान दिले. तळाच्या फलंदाजांना फिरकीपटू लियॉनने झटपट बाद करत किवीज संघाचा डाव संपवला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या चारच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. किवीज संघाने पहिल्या डावात 179 धावा केल्या. कांगारुंकडून लियॉनने 4, हॅजलवूडने 2 तर स्टार्क, कमिन्स व मार्शने एकेक गडी बाद केला. दरम्यान, लियॉनने चार बळी घेत विंडीजच्या कर्टनी वॉल्श (519 बळी) यांना मागे टाकले आहे. लियॉनच्या नावे आता 521 बळी असून तो कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे.
कांगारूंची खराब सुरुवात
न्यूझीलंडला 179 धावांत गुंडाळल्यानंतर ऑसी संघाला पहिल्या डावात 204 धावांची भक्कम आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला दोन धक्के बसले. सलामीवीर स्टीव्ह स्मिथला साऊदीने पहिल्याच षटकात बाद केले. स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. लाबुशेन 2 धावा करुन साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑसी संघाने 2 बाद 13 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे आता 217 धावांची आघाडी आहे.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव 383 व दुसरा डाव 8 षटकांत 2 बाद 13 (स्मिथ 0, लाबुशेन 5, उस्मान ख्वाजा खेळत आहे 5, लियॉन खेळत आहे 2, टीम साऊदी 2 बळी).
न्यूझीलंड पहिला डाव 43.1 षटकांत सर्वबाद 179 (टॉम ब्लंडेल 33, ग्लेन फिलिप्स 71, मॅट हेन्री 42, लियॉन 43 धावांत 4 बळी, हॅजलवूड 2 बळी).
न्यूझीलंडच्या नावे नकोसा विक्रम
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे सुरू आहे. दरम्यान, पहिल्या डावात यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वाईड बॉलचा विक्रम केला आहे. पहिल्या डावात तब्बल 20 वाईड बॉल टाकत न्यूझीलंडने एक अप्रिय विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 383 धावा केल्या. विशेष म्हणजे, किवी गोलंदाजांनीही वाईड चेंडू टाकत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवण्यात हातभार लावला आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तब्बल 20 वाईड चेंडू टाकले आहेत. किवीज गोलंदाज विल्यम ओरूरकेने 11, स्कॉटने 7 तर मॅट हेन्रीने 2 वाईड बॉल टाकले. याशिवाय भरीस भर म्हणून 3 नोबॉल देखील टाकले. या 23 अतिरिक्त धावांमुळे कांगारूंचा चांगलाच फायदा झाला.
12 वर्षात प्रथमच केन विल्यम्सन धावबाद
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत सामन्यात अनेक मजेशीर गोष्टी पहायला मिळाल्या. या सामन्यात सर्वांच्या नजरा दिग्गज खेळाडू केन विल्यम्सनवर खिळल्या होत्या. मात्र दुर्दैवाने तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. विशेष म्हणजे, 2012 नंतर प्रथमच विल्यम्सन कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद झाला आहे. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर विल्यम्सन धावत होता. पण दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या विल यंगसोबत समन्वयाचा अभाव होता आणि लाबुशेनने थेट मारलेल्या फटक्यामुळे विल्यम्सनची विकेट पडली. केन विल्यम्सन 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा धावबाद झाला आहे. यापूर्वी तो झिम्बाब्वेविरुद्ध दोनदा धावबाद झाला होता. आता तो 12 वर्षानंतर कांगारुविरुद्ध धावबाद झाला आहे.