पहिल्याच दिवशी कांगारुंचे वर्चस्व, विंडीज सर्वबाद 188
हॅजलवूड, कमिन्सचे प्रत्येकी चार बळी : ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात, दिवसअखेरीस 2 बाद 59 धावा
वृत्तसंस्था/ अॅडलेड
वेस्ट इंडिजचा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना आज (17 जानेवारी) बुधवारपासून अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी हॅजलवूड व कमिन्सने शानदार गोलंदाजी करत विंडीजला 188 धावांवर गुंडाळले. यानंतर पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाने 21 षटकांत 2 बाद 59 धावा केल्या. दिवसअखेरीस उस्मान ख्वाजा 30 तर कॅमरुन ग्रीन 6 धावांवर खेळत होते.
सुरुवातीला ऑसी कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवताना जोस हॅजलवूड (44 धावांत 4 बळी) व पॅट कमिन्स (41 धावांत 4 बळी) यांनी अप्रतिम गोलंदाजी करताना विंडीजला 188 धावांवर गुंडळाले. विंडीजकडून क्रेग ब्रेथवेट सर्वाधिक 50 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्याने विंडीजची 9 बाद 133 अशी बिकट स्थिती होती. 133 धावात 9 विकेट पडल्यानंतर केमार रोच आणि युवा गोलंदाज शमार जोसेफ यांनी अखेरच्या विकेटसाठी 55 धावांची भागिदारी केली. 11 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शमार जोसेफने 41 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. यामुळे विंडीज संघाला 188 धावांचा टप्पा गाठता आला.
सलामीवीर स्मिथच्या केवळ 12 धावा
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा नवा सलामीवीर बनला आहे. पण सलामीवीर म्हणून पहिल्या सामन्यात तो फ्लॉप ठरला. वेस्ट इंडिजकडून पदार्पणाचा सामना खेळणारा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज शमार जोसेफने पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बाद केले. स्मिथने केवळ 12 धावा केल्या. लाबुशेनही फार काळ मैदानावर टिकला नाही. 10 धावांवर त्याला शमार जोसेफने बाद केले. यानंतर दिवसअखेरीस उस्मान ख्वाजा व कॅमरुन ग्रीन यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑसी संघाने 21 षटकांत 2 बाद 59 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया सध्या वेस्ट इंडिजपेक्षा 129 धावांनी मागे आहे.
संक्षिप्त धावफलक : विंडीज पहिला डाव 61.2 षटकांत सर्वबाद 188 (क्रेग ब्रेथवेट 50, केमार रोच 17, शमार जोसेफ 36, हॅजलवूड व कमिन्स प्रत्येकी 4 बळी, स्टार्क व लियॉन प्रत्येकी 1 बळी)
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 21 षटकांत 2 बाद 59 (स्टीव्ह स्मिथ 12, लाबुशेन 10, ख्वाजा खेळत आहे 30, ग्रीन खेळत आहे 6, शमार जोसेफ 18 धावांत 2 बळी) .