विंडीजमध्ये कांगारुंचा दबदबा
दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 133 धावांनी दणदणीत विजय : यजमान विंडीजने मालिका गमावली
वृत्तसंस्था/ ग्रेनेडा (वेस्ट इंडिज)
ग्रेनडा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान वेस्ट इंडिजचा 133 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियाने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली आहे. हा सामना फक्त चार दिवसांत संपला. मालिकेतील शेवटचा सामना 12 जुलैपासून जमैकामधील सबिना पार्क येथे दिवस-रात्र सामना म्हणून खेळवला जाईल. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने यजमान वेस्ट इंडिजसमोर 277 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण त्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 143 धावा करून सर्वबाद झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
प्रारंभी, पहिली कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात त्यांनी 286 धावा केल्या, ज्यामध्ये अॅलेक्स कॅरीच्या 81 चेंडूत 63 धावा आणि ब्यू वेबस्टरच्या 115 चेंडूत 60 धावा यांचे महत्त्वाचे योगदान होते. विंडीजकडून अल्झारी जोसेफ हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने पहिल्या डावात 4 बळी घेतले. यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद 253 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने 75 धावांची खेळी केली. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. पहिल्या डावात नॅथन लायनने 3 बळी घेतले तर कमिन्स आणि हेझलवूडने प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
विंडीजच्या फलंदाजांचे सपशेल लोटांगण
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात कॅमरुन ग्रीन (52) आणि स्टीव्ह स्मिथ (71) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 243 धावा केल्या. इतर ऑसी खेळाडूंना मोठी खेळी साकारता आली नाही. विंडीजकडून वेगवान गोलंदाज शामर जोसेफने 4 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजसमोर ऑस्ट्रेलियाने 277 धावांचे लक्ष्य ठवले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डर फलंदाजांची खराब कामगिरी सुरूच राहिली. उपाहारापूर्वी 12.4 षटकांत कॅरेबियन संघाने 33 धावांत चार गडी गमावले होते. रोस्टन चेस आणि शाय होप यांनी पाचव्या विकेटसाठी 47 चेंडूत 38 धावांची भागीदारी केली. रोस्टन चेस संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 41 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले तर होपने 25 चेंडूत 17 धावा केल्या. याशिवाय, शमार जोसेफने 24 धावा फटकावल्या. इतर फलंदाजांनी मात्र हजेरी लावण्याचे काम केल्याने विंडीजचा दुसरा डाव 34.3 षटकांत 143 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोस हेजलवूडने 2 तर पॅट कमिन्स, वेबस्टर यांनी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 286
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 243
वेस्ट इंडिज पहिला डाव 253
वेस्ट इंडिज दुसरा डाव 34.1 षटकांत सर्वबाद 143 (केसी कार्टी 10, ब्रेंडॉन किंग 14, रोस्टन चेस 34, शाय होप 17, शमार जोसेफ 24, मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन प्रत्येकी 3 बळी).
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कांगारुंचा दबदबा
sंऊण् 2025-27 स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज आणि इंग्लंड-भारत यांच्यात कसोटी मालिका सुरु आहेत. रविवारी भारताने इंग्लंडला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत केले आणि मालिकेतही 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला रविवारीच पराभवाचा धक्का दिला. या दोन सामन्यांच्या निकालानंतर sंऊण् 2025-27 गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे. कांगारुंनी या स्पर्धेत आत्तापर्यंत 2 सामने खेळताना दोन्ही सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचे 24 गुण असून 100 टक्केवारी आहे. तसेच इंग्लंडला भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पराभूत व्हावं लागल्याने तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारताचेही इंग्लंडप्रमाणे दोन सामन्यांनंतर एक विजय आणि एका पराभवासह 12 गुण असून 50 टक्केवारी आहे. सध्या ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे. श्रीलंकेचे सध्या 16 गुण असून 66.67 टक्केवारी आहे. बांगलादेश या मालिका पराभवानंतर पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचे 4 गुण असून 16.67 टक्केवारी आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामने हरल्याने त्यांचे गुणांचे खाते उघडलेले नाही.