कांगारुंनी विक्रमी टार्गेट पूर्ण करत इंग्लंडला नमवले
ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय : शतकवीर जोस इंग्लिशसमोर इंग्लंडचा संघ ठरला हतबल : एकाच सामन्यात दोनदा विक्रमाला गवसणी
वृत्तसंस्था/ लाहोर
जोस इंग्लिशचे दमदार शतक, मॅथ्यू शॉर्ट, अॅलेक्स केरी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील 351 धावांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. पण हार मानेल तो ऑस्ट्रेलियाचा संघ कसला.. बडे खेळाडू संघाचा भाग नसतानाही ऑस्ट्रेलियाच्या नवख्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड व कर्णधार स्टीव्ह स्मिथ स्वस्तात बाद झाले. ही जोडी बाद झाल्यानंतर मॅथ्यू शॉर्ट व लाबुशेनने संघाचा डाव सावरला. शॉर्टने अर्धशतकी खेळी साकारताना 66 चेंडूत 63 धावा फटकावल्या तर लाबुशेनने 47 धावांचे योगदान दिले. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर जोस इंग्लिस व अॅलेक्स केरी यांनी तुफानी फटकेबाजी केली.
जोस इंग्लिशची मॅचविंनीग खेळी
यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसने वनडेमधील आपले पहिले शतक झळकावत मोठा विक्रमही आपल्या नावे केला. इंग्लिसने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील संयुक्त जलद शतक झळकावले आहे. त्याने वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली. जोश इंग्लिसने 86 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह 120 धावांची नाबाद खेळी केली. यानंतर अॅलेक्स कॅरीसह त्याने केलेली भागीदारी मॅचविनिंग ठरली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 146 धावांची भागीदारी साकारली. केरीने 8 चौकारासह 69 धावा करत इंग्लिसला मोलाची साथ दिली. केरी बाद झाल्यानंतर इंग्लिसने मॅक्सवेलला सोबतीला घेत संघाला 47.3 षटकांत विजय मिळवून दिला.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मिथचा हा निर्णय मात्र चांगलाच चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिल सॉल्ट 10 धावा काढून बाद झाला. सॉल्टचा अफलातून झेल अॅलेक्स कॅरीने माघारी येत पकडला. युवा फलंदाज जेमी स्मिथ फारशी चमक दाखवता आली नाही. 15 धावा काढून तो माघारी परतला.
बेन डकेटचे शतक, रुटची अर्धशतकी खेळी
सलामीचे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी बेन डकेट व जो रुट यांनी संघाला सावरले. या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी करत 158 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान, डकेटने वनडेतील तिसरे शतक 95 चेंडूत पूर्ण केले. यानंतर डकेटने आक्रमक खेळताना 143 चेंडूत 17 चौकार व 3 षटकारासह 165 धावांची शानदार खेळी साकारली. अर्थात, डकेटची ही खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च खेळी ठरली आहे. डकेटला जो रुटने चांगली साथ देताना 4 चौकारासह 68 धावा फटकावल्या. रुट बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक (3) व जोस बटलर (23) हे स्टार फलंदाज अपयशी ठरले. अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरने 2 चौकार आणि एका षटकाराह 21 धावांची खेळी करत संघाला 350 धावांचा आकडा गाठून दिला. लिव्हिंगस्टोनला 14 धावा करता आल्या. यामुळे इंग्लंडने 50 षटकांत 8 गडी गमावत 351 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 50 षटकांत 8 बाद 351 (फिल सॉल्ट 10, बेन डकेट 165, जो रुट 68, हॅरी ब्रुक 3, जोस बटलर 23, जोफ्रा आर्चर नाबाद 21, बेन द्वारशुईस 3 बळी, लाबुशेन व अॅडम झम्पा प्रत्येकी दोन बळी).
ऑस्ट्रेलिया 47.3 षटकांत 5 बाद 356 (मॅथ्यू शॉर्ट 63, लाबुशेन 47, जोस इंग्लिश नाबाद 120, अॅलेक्स केरी 69, मॅक्सवेल नाबाद 32, मार्क वूड, आर्चर, कारसे, रशीद व लिव्हिंगस्टोन प्रत्येकी 1 बळी).
बेन डकेटची चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च खेळी
इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेटने बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात 143 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 165 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यासह डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली आहे. या अफलातून खेळीसह डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीत दीडशतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला. 1998 साली चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली. तेव्हापासून एकाही फलंदाजाला दीडशतकी खेळी करता आली नव्हती. याआधी या स्पर्धेत सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम नॅथन अॅस्टले व अँडी फ्लॉवर (145 धावा) यांच्या नावावर होता. हा विक्रम डकेटने मोडला.
चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वोच्च धावा करणारे फलंदाज
बेन डकेट (165 धावा) - इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया, 2025
नॅथन अॅस्टले (145 धावा) - न्यूझीलंड वि अमेरिका, 2004
अँडी फ्लॉवर (145 धावा) - झिम्बाब्वे वि भारत, 2002
सौरव गांगुली (141 धावा) - भारत वि द.आफ्रिका, 2000
एकाच सामन्यात दोनवेळा वर्ल्डरेकॉर्ड, कांगारुंची स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या
चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये सामना खेळवला गेला. प्रारंभी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना बेन डकेटचे शानदार दीडशतक व जो रुटची अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकांत 8 बाद 351 धावा केल्या. इंग्लंडची ही चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. पण, इंग्लंडचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. कांगारुंनी 47.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 356 धावा करत इंग्लंडचा हा विक्रम मोडित काढला. कांगारुंनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा पराक्रम केला.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या
5 बाद 356, ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, लाहोर, 2025
8 बाद 351 धावा, इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर 2025
4 बाद 347, न्यूझीलंड वि. अमेरिका, द ओव्हल 2004
4 बाद 338 धावा, पाकिस्तान वि. भारत, द ओव्हल 2017
7 बाद 331 धावा, भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डिफ 2013