कांगारुंचा पलटवार, विंडीजला 159 धावांनी नमवले
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (वेस्ट इंडिज)
मोक्याच्या क्षणी ट्रॅव्हिस हेडने साकारलेली अर्धशतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडचे पाच बळी या जोरावर ऑस्ट्रेलियाने जोरदार पलटवार करताना पहिल्याच कसोटीत विंडीजला पराभवाचा दणका दिला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकत कांगारुंनी मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 3 जुलैपासून गयाना येथे खेळवला जाईल.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 180 धावांवर गुंडाळल्यानंतर यजमान विंडीजने 190 धावा करून 10 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज 65 धावांवर तंबूत परतले होते आणि विंडीजला सामन्यावरील पकड मजबूत करण्याची संधी होती. पण, गचाळ क्षेत्ररक्षणाने विंडीजचा घात केला आणि त्यात अम्पायरचे काही निर्णय त्यांच्या विरोधातही गेले. या दोन्ही गोष्टींचा यजमानांना खूप मोठा फटका बसला.
हेड-वेबस्टरची शतकी भागीदारी
ट्रॅव्हिस हेड व बियू वेबस्टर या दोघांनी शतकी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावर आणली. हेड 95 चेंडूंत 61 धावांवर बाद झाला. त्यानंतर अॅलेक्स केरीने अर्धशतकी खेळी केली. यानंतर वेबस्टरनेही अर्धशतकी खेळी साकारताना 8 चौकारासह 63 धावांचे योगदा दिले तर अनुभवी अॅलेक्स केरीनेही सर्वाधिक 65 धावा केल्या. गोलंदाजासाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर तळाच्या फलंदाजांनी 50-60 धावांचे योगदान दिले. या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 310 धावांपर्यंत मजल मारली आणि यजमान विंडीजला विजयासाठी 301 धावांचे आव्हान दिली. विंडीजकडून शामर जोसेफने सर्वाधिक 87 धावांत 5 विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफने दोघांना माघारी पाठवले.
विंडीज खेळाडूंचे सपशेल लोटांगण
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 301 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीसमोर कॅरेबियन फलंदाज असहाय्य दिसत होते. वेस्ट इंडिजचे 7 खेळाडू दोन आकडी धावा करू शकले नाहीत आणि कॅरेबियन संघाचा डाव फक्त 141 धावांवर कोसळला. त्यांना 159 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शमर जोसेफ (44) आणि जस्टिन ग्रीव्हज (नाबाद 38) यांनी शेवटच्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजसाठी एक छोटेसे आव्हान उभे केले, पण ते पुरेसे नव्हते. नॅथन लायनने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला शानदार विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 43 धावांत 5 बळी असा अप्रतिम स्पेल टाकून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. याशिवाय, नॅथन लायनने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 180
वेस्ट इंडिज पहिला डाव 190
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 310
वेस्ट इंडिज दुसरा डाव 33.4 षटकांत सर्वबाद 141 (कॅम्पबेल 23, केसी कार्टी 20, जस्टिन ग्रीव्हज नाबाद 38, शेमार जोसेफ 44, हेजलवूड 5 बळी, नॅथन लायन 2 बळी).
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारताविरुद्ध विजयानंतर इंग्लंडही 12 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकन संघ तिसऱ्या स्थानावर असून बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.