कांगांरुनी वनडेचा वचपा टी-20 मध्ये काढला
टी-20 मालिकेत पाकचा व्हाईटवॉश : तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पाकचा धुव्वा
वृत्तसंस्था/ होबार्ट
जोस इंग्लिशच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या टी-20 मालिकेपूर्वी दोन्ही देशांदरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने 2-1 ने विजय मिळवला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने वनडेतील पराभवाचा बदला घेत टी-20 मालिका 3-0 ने जिंकली. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना 18.1 षटकांत 117 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य ऑसी संघाने 11.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. 27 चेंडूत 61 धावांची खेळी साकारणाऱ्या मार्क स्टोइनिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, पाक कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. डावातील दुसऱ्याच षटकात सलामीवीर साहिबजादा फरहानला (9) स्पेन्सर जॉन्सनने बाद केले. यानंतर बाबर आझम व हासीबउल्लाह खान यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आझमने 4 चौकारासह 41 धावा केल्या तर हासीबुल्लाहने 3 चौकारासह 24 धावांचे योगदान दिले. हे दोघे बाद झाल्यानंतर पाकच्या फलंदाजीला उतरण लागली. इरफान खान 10, अब्बास आफ्रिदी 1, जहाँदाद खान 5, शाहीन आफ्रिदी 16, सुफियान मुकीम 1 धाव करून बाद झाले. शाहीन आफ्रिदीने 12 चेंडूत 16 धावा केल्यामुळे पाकला शंभरी गाठता आली. पाकचा डाव 18.1 षटकांत 117 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन हार्डीने 3 तर स्पेन्सर जॉन्सन, झाम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
मार्क स्टोनिसची आक्रमक खेळी
पाकने विजयासाठी दिलेल्या 118 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट 2 तर मॅकगर्क 18 धावा काढून माघारी परतला. सुरुवातीला लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्क स्टोइनिस व कर्णधार जोस इंग्लिश यांनी पाक गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्टोइनिसने 25 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने नाबाद 61 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला जोस इंग्लिशने 27 धावा करत चांगली साथ दिली. इंग्लिश बाद झाल्यानंतर स्टोइनिसने टीम डेव्हिडच्या साथीने संघाला 11.2 षटकांतच विजय मिळवून दिला. डेव्हिड 7 धावांवर नाबाद राहिला. पाककडून शाहिन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी व जहाँदाद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 18.1 षटकांत सर्वबाद 117 (बाबर आझम 41, हसीबउल्लाह खान 24, इरफान खान 10, शाहिन आफ्रिदी 16, अॅरॉन हार्डी 3, जॉन्सन व झ्पम्पा प्रत्येकी 2 बळी).
ऑस्ट्रेलिया 11.2 षटकांत 3 बाद 118 (मॅथ्यू शॉर्ट 2, मॅकगर्क 18, इंग्लिश 27, स्टोनिस नाबाद 61, डेव्हिड नाबाद 7, शाहिन आफ्रिदी, खान व अब्बास आफ्रिदी प्रत्येकी एक बळी).
बाबर आझमची विक्रमी कामगिरी
बाबर आझम आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. आतापर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता विराट कोहलीला मागे टाकत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सध्या भारताचा रोहित शर्मा आहे. त्याने एकूण 159 सामने खेळून 4231 धावा केल्या आहेत. यानंतर बाबर आझमचा क्रमांक लागतो. आतापर्यंत बाबरने 126 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 4192 धावा केल्या आहेत. लवकरच ते 4200 चा आकडाही पार करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 41 धावांची खेळी साकारली. या खेळीसह त्याने विराट कोहलीला मागे टाकले.