टीम इंडियाला रोखण्यासाठी कांगारुचे दिग्गज मैदानात
वनडे, टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा : मिचेल स्टार्कचे कमबॅक, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉला संघात स्थान
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्ध वनडे आणि टी 20 मालिकेसाठी तगडा संघ जाहीर केला आहे. मिचेल मार्शकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचेही संघात कमबॅक झाले आहे. याशिवाय, मॅट रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट यांचीही संघात वर्णी लागली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. उभय संघातील वनडे मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
मिचेल स्टार्कच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी आक्रमक झाली आहे. मिचेल मार्शला एकदिवसीय आणि टी-20 साठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अॅरोन हार्डी आणि मार्नस लाबुशेन यांना एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. एकदिवसीय सामन्यांसोबतच, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी 14 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात नॅथन एलिस आणि जोश इंग्लिश यांचाही समावेश करण्यात आला आहे.
खराब कामगिरीमुळे लाबुशेनला वगळले
लाबुशेन गेल्या 10 वनडे डावात धावांसाठी संघर्ष करत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मॅट शॉर्ट दुखापतग्रस्त झाल्याने लाबुशेनला संधी मिळाली मात्र त्याला या संधीचा फायदा उठवता आला नाही. वनडे संघातून डच्चू देण्यात आल्याने तो आगामी अॅशेस मालिकेसाठी शेफील्ड शिल्डचे सामने खेळून तयारी करू शकतो. रेनशॉने ऑस्ट्रेलिया ए संघासाठी खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीचा विचार करत त्याला भारताविरुद्ध मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे.
स्टार्कचा समावेश तर कमिन्स दुखापतीमुळेच बाहेरच
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरनंतर तो प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे. याशिवाय, मागील महिन्यातच त्याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती, पण विराट, रोहितला रोखण्यासाठी तो आता संघात सामील झाला आहे. अर्थात, स्टार्कच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी मजबूत झाली आहे. दुसरीकडे, दुखापतीमुळे पॅट कमिन्स अद्याप बाहेरच आहे. दुखापत बरी होण्यासाठी काही कालावधी लागेल असे डॉक्टराकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय, कॅमरुन ग्रीन हा वनडे मालिकेत खेळताना दिसेल मात्र टी 20 मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही.
पुढच्या वर्षी होणारा टी 20 वर्ल्डकप लक्षात घेऊन संघाची रचना करण्यात आली आहे. खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यावर भर दिला असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले. भारतीय संघ या द्रौयात 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.
वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ - मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा.
पहिल्या दोन टी 20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ - मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झम्पा.