कांगांरुनी पाकिस्तानला हरवले
ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकच्या पदरी पराभव : पहिल्या वनडेत यजमानांचा दोन विकेट्सनी विजय
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
पाकचा अव्वल खेळाडू मोहम्मद रिझवानच्या कॅप्टन्सीच्या नव्या प्रवासाची सुरुवात पराभवाने झाली आहे. ऑस्ट्रेलियाने रंगतदार झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 204 धावांचे आव्हान दिले होते, ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केले. कर्णधार पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. कमिन्सने निर्णायक क्षणी नाबाद 32 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाला विजयी सुरुवात करुन दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 8 रोजी अॅडलेड येथे होईल. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तानने 70 धावांपर्यंत 4 विकेट गमावल्या होत्या आणि दरम्यान बाबर आझम 37 धावांवर अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नवा कर्णधार मोहम्मद रिझवानने 44 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने 24 धावांची तर नसीम शाहने 40 धावांची खेळी खेळून प्रभावित केले. सलमान आगाने 12 तर इरफान खानने 22 धावांचे योगदान दिले. इतर पाकच्या फलंदाजांच्या कांगांरुच्या माऱ्यासमोर टिकाव लागला नाही. पाकचा डाव 46.4 षटकांत 203 धावांत संपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले.
कमिन्सच्या खेळीने सामन्याला कलाटणी
पाकने विजयासाठी दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना यजमान संघाचीही खराब सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट व मॅकगर्क झटपट बाद झाले. यानंतर स्टीव्ह स्मिथ व जोस इंग्लिस या दोघांनी 85 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्मिथला (44 धावा) बाद करत हॅरिस रौफने ही जोडी फोडली. पाठोपाठ इंग्लिसही 49 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अर्धशतकाच्या उंबरठयावर असलेल्या इंग्लिसला शाहीन आफ्रिदीने बाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी झाली. पाकिस्तानने झटक्यावर झटके दिले. स्मिथनंतर जोस 49, मार्नस लाबुशेन 16, ग्लेन मॅक्सवेल 0, आरोन हार्डी 10 आणि सीन एबॉट 13 धावांवर बाद झाले. यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 8 बाद 185 अशी झाली. अशावेळी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला होता. मात्र कर्णधार पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कला सोबतीला घेत संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सने 4 चौकारासह नाबाद 32 तर स्टार्कने नाबाद 2 धावा केल्या. पाककडून हॅरिस रौफने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 46.4 षटकांत सर्वबाद 203 (बाबर आझम 37, मोहम्मद रिझवान 44, इरफान खान 22, नसीम शाह 40, मिचेल स्टार्क 3 बळी, कमिन्स व झम्पा 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 33.3 षटकांत 8 बाद 204 (स्मिथ 44, इंग्लिस 49, कमिन्स नाबाद 32, रौफ 3 बळी, आफ्रिदी 2 बळी).
मिचेल स्टार्कचाही अनोखा धमाका
पाकिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वात जलद 100 बळी घेण्याचा मोठा विक्रम केला. स्टार्कने या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीला मागे टाकले. ब्रेट लीने आपल्या कारकिर्दीतील 55 व्या डावात ही कामगिरी केली होती. तर स्टार्कने हा विक्रम करण्यासाठी त्याच्यापेक्षा एक डाव कमी घेतला. याशिवाय, ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, क्रेग मॅकडरमॉट आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर 100 वनडे विकेट घेणारा तो सहावा गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियात वनडेत सर्वात कमी डावात 100 बळी घेणारे गोलंदाज
मिचेल स्टार्क - 54 डाव
ब्रेट ली - 55 डाव
ग्लेन मॅकग्रा - 56 डाव
शेन वॉर्न - 61 डाव
क्रेग मॅकडरमॉट - 71 डाव
स्टीव्ह वॉ - 93 डाव.