न्यूझीलंडच्या डावात केन विल्यमसनचे अर्धशतक
दिवसअखेर 9 बाद 231 धावा, विंडीजचा प्रभावी मारा
वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान न्यूझीलंडने विंडीज विरुद्ध पहिल्या डावात दिवसअखेर 9 बाद 231 धावा जमविल्या. विंडीजच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. तब्बल एक वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या माजी कर्णधार विल्यमसनने अर्धशतक झळकविले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 38 वे अर्धशतक आहे.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. ग्रिव्स, रॉच आणि शिल्ड्स यांनी प्रभावी गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविले. पावसामुळे हा सामना उशीरा सुरू झाला. त्यामुळे दिवसभरातील खेळात केवळ 70 षटके टाकण्यात आली. न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर रॉचने सलामीच्या कॉन्वेला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार लॅथम आणि विल्यमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागिदारी केली. ग्रिव्सने विल्यमसनला झेलबाद केले. त्याने 102 चेंडूत 6 चौकारांसह 52 धावा जमविल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 38 वे अर्धशतक आहे. विल्यमसन बाद झाल्यानंतर लॅथमही ग्रिव्सचा दुसरा बळी ठरला. त्याने 85 चेंडूत 2 चौकारांसह 24 धावा केल्या. सेल्सने रचिन रवींद्रचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. लेनीने यंगला झेलबाद केले. त्याने 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. चहापानावेळी न्यूझीलंडने 43 षटकांत 5 बाद 128 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये न्यूझीलंडने 103 धावा जमविताना 4 गडी गमविले. ब्लंडेलने 39 चेंडूत 2 चौकारांसह 29 तर नाथन स्मिथने 61 चेंडूत 3 चौकारांसह 23 तसेच ब्रेसवेलने 73 चेंडूत 6 चौकारांसह 47 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 23 अवांतर धावा मिळाल्या. पंचांनी या कसोटीतील पहिल्या दिवशी उपाहार लवकर घेतला. पहिल्या सत्रात 10.3 षटकांत न्यूझीलंडने 1 बाद 17 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पंचांनी चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रातील कालावधी वाढविला. विंडीजतर्फे केमर रॉच, कसोटी पदार्पण करणाऱ्या शिल्ड्स आणि ग्रिव्स यांनी प्रत्येकी 2 तर सील्स, लेनी आणि चेस यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. गेल्या जानेवारीनंतर 37 वर्षीय रॉचची ही पहिली कसोटी आहे. शिल्ड्सचे 29 व्या वर्षात कसोटी पदार्पण झाले तर 22 वर्षीय लेनीची ही दुसरी कसोटी आहे. 2025 च्या क्रिकेट हंगामात न्यूझीलंडने आतापर्यंत एकमेव कसोटी मालिका गेल्या ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळली होती आणि त्यांनी ती मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 70 षटकांत 9 बाद 231 (विल्यमसन 52, ब्रेसवेल 47, ब्लंडेल 29, लॅथम 24, स्मिथ 23, यंग 14, अवांतर 23, रॉच, शिल्ड्स, ग्रिव्स प्रत्येकी 2 बळी, सील्स, लेनी, चेस प्रत्येकी 1 बळी).