केन विल्यम्सनचे कमबॅक, न्यूझीलंड 8 बाद 319
इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी : विल्यम्सनचे शतक सात धावांनी शतक हुकले : शोएब बशीरचे 4 बळी
वृत्तसंस्था/ख्राईस्टचर्च
माजी किवी कर्णधार केन विल्यम्सनने जवळपास 2 महिन्यांनंतर पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. इंग्लंडच्या न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना ख्राइस्टचर्चमध्ये खेळवला जात आहे. गुरुवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 8 बाद 319 धावा केल्या होत्या. ग्लेन फिलिप्स 41 आणि टीम साऊथी 10 धावांवर नाबाद आहे. किवीजकडून केन विल्यमसनने सर्वाधिक 93 धावांची खेळी खेळली. दुखापतीनंतर तो कसोटीत पुनरागमन करत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाने 4 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावली. गॉस ऍटकिन्सनने ड्वॉन कॉनवेला झेलबाद केले. युवा रचिन रवींद्रने 34 धावांचे योगदान दिले. डॅरिल मिशेलला केवळ 19 धावा करता आल्या. कर्णधार टॉम लॅथमने 6 चौकारासह 47 धावा फटकावल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला ब्रायडन कारसेने माघारी पाठवले.
केन विल्यम्सन ठरला नर्व्हस 90 चा बळी, सचिननंतर दुसऱ्या स्थानी
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यम्सन पुन्हा एकदा नर्व्हस नाईंटीजचा बळी ठरला. 93 धावसंख्येवर तो 61 व्या षटकात ऍटकिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विल्यम्सन शतकाच्या जवळ येऊन 90च्या धावांवर बाद होण्याची 13 वी वेळ आहे. यासह, तो सर्वाधिक वेळा नर्व्हस नाईंटीजचा बळी ठरणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने टीम इंडियाची माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविड त्याच्या कारकिर्दीत 90 च्या धावांवर 12 वेळा बाद झाला होता. या यादीत भारताचा दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तो नर्व्हस 90 चा बळी तब्बल 27 वेळा ठरला आहे.
सर्वाधिक वेळा नर्व्हस 90 च्या धावसंख्येवर बाद झालेले खेळाडू
- सचिन तेंडुलकर 27 वेळा
- केन विल्यम्सन 13 वेळा
- राहुल द्रविड 12 वेळा
- एबी डीव्हिलीयर्स 12 वेळा
कसोटी क्रिकेटला पुन्हा अच्छे दिन, न्यूझीलंड-इंग्लंड सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी
क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये कसोटी हा सर्वात जुना फॉरमॅट आहे. आज जरी चाहते टी 20 क्रिकेट पाहण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक असले तरी एक काळ असा होता, जेव्हा फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे आणि स्टेडियम पूर्णपणे भरले जायचे. पण काळ बदलला आणि कसोटी क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली. कसोटी क्रिकेट आज टी-20 क्रिकेटइतके लोकप्रिय नसेल, परंतु चाहते अजूनही दोन मोठ्या संघांमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना पाहण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळेच कसोटी क्रिकेट पुन्हा एकदा लोकप्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना ख्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी लंच ब्रेक झाल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मैदानात जाण्याची परवानगी देण्यात आली. ही सुवर्णसंधी मिळताच काही वेळातच शेकडो प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान भरले. यावेळी अनेक प्रेक्षक सेल्फी घेऊ लागले तर अनेकांनी मैदानात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव 83 षटकांत 8 बाद 319 (टॉम लॅथम 47, केन विल्यम्सन 93, रचिन रविंद्र 34, डॅरिल मिचेल 19, टॉम ब्लंडेल 17, ग्लेन फिलिप्स नाबाद 41, साऊदी नाबाद 10, शोएब बशीर 69 धावांत 4 बळी, ऍटकिन्सन व कारसे प्रत्येकी दोन बळी).