केन विल्यम्सनचे शतक, तैजुल इस्लामचे 4 बळी
बांगलादेश पहिल्या डावात 310, न्यूझीलंड 8 बाद 266
वृत्तसंस्था/ सिल्हेत
बांगलादेशविरुद्ध येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केन विल्यम्सन पुन्हा एकदा न्यूझीलंडचा तारणहार ठरला. त्याने नोंदवलेल्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दिवसअखेर 8 बाद 266 धावा जमविल्या. बांगलादेशपेक्षा ते अद्याप 44 धावांनी पिछाडीवर आहेत.
बांगलादेशने पहिल्या दिवशी मेहमुदुल हसन जॉयचे अर्धशतक (86) व इतर फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त धावांमुळे 85.1 षटकांत 9 बाद 310 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. पण साऊदीच्या पहिल्याच चेंडूवर शोरिफुल इस्लाम पायचीत झाल्याने याच धावसंख्येवर बांगलादेशचा पहिला डाव समाप्त झाला. बांगलादेशच्या डावात कर्णधार नजमुल हुसेन शांतो व मोमिनुल हक यांनी प्रत्येकी 37, नुरुल हसनने 29, मेहिदी हसन मिराझने 20, शहादत हुसेनने 24, नईम हसनने 16 धावा केल्या. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने 53 धावांत 4 बळी टिपले तर जेमीसन व एजाझ पटेल यांनी प्रत्येकी 2 व साऊदी, ईश सोधी यांनी एकेक बळी मिळविला.
न्यूझीलंडच्या डावाचीही खराब सुरुवात झाली आणि लवकरच त्यांची स्थिती 3 बाद 98 अशी झाली. लॅथम 21 तर कॉनवे 12 व हेन्री निकोल्स 19 धावा काढून बाद झाले. माजी कर्णधार केन विल्यम्सनने निकोल्ससमवेत 54 धावांची भर घातल्यानंतर डॅरील मिचेलसमवेत 66 धावांची व नंतर ग्लेन फिलिप्ससमवेत 78 धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. मिचेलने 54 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 41, फिलिप्सने 62 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 42 धावा जमविल्या. विल्यम्सने सातव्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याने 205 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 104 धावा काढल्या. फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याने पाच तास किल्ला लढवित 29 वे शतक नोंदवत सर डॉन ब्रॅडमन व विराट कोहली यांच्याशी बरोबरी केली. बांगलादेशच्या तैजुल इस्लामने 89 धावांत 4 तर शोरिफुल इस्लाम, मेहिदी हसन मिराझ, नईम हसन, मोमिनुल हक यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 85.1 षटकांत सर्व बाद 310 : मेहमुदुल हसन जॉय 11 चौकारांसह 86, नजमुल शांतो 37, मोमिनुल हक 37, नुरुल हसन 29, शहादत हुसेन 24, अवांतर 16. गोलंदाजी : फिलिप्स 4-53, एजाझ पटेल 2-76, जेमीसन 2-52, सोधी 1-71, साऊदी 1-43. न्यूझीलंड प.डाव 84 षटकांत 8 बाद 266 : लॅथम 21, विल्यम्सन 11 चौकारांसह 104, मिचेल 41, फिलिप्स 42, निकोल्स 19, अवांतर 13. गोलंदाजी : तैजुल इस्लाम 4-89, मोमिनुल हक 1-2, शोरिफुल 1-44, मेहिदी हसन मिराझ 1-57, नईम हसन 1-61.