कंदमुळे फूड फेस्टिव्हलचे आज उद्घाटन
कारवार : जोयडा येथील कुणबी समाज भवनाच्या आवारात बुधवार दि. 8 रोजी अकरावा कंदमुळे मेळावा आणि कंदमुळे फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. जोयडा तालुका कुणबी समाज अभिवृद्धी संघ, काळी टुरीझम असोसिएशन जोयडा, काळी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, पुंभारवाडा आणि कंदमुळे उत्पादक असोसिएशन जोयडा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कंदमुळे मेळावा आणि कंदमुळे फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन सकाळी 11 वाजता हल्याळ-जोयडाचे आमदार आणि प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. फेस्टिव्हलला कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी ईश्वर भांदू, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रुपाली पाटीलसह (शिरसी) अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण कर्नाटकातील अत्यंत मागासलेला तालुका म्हणून ओळखला जाणारा जोयडा तालुका कंदमुळांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. जलसंपदा, वनसंपदा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जोयडा तालुक्यात 50 हून अधिक जातींची कंदमुळे पिकविली जातात. वन्य प्राण्यांच्या बाबतीत श्रीमंत असलेला हा तालुका पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. रुढी, परंपरा जपणारा आणि सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत असलेला कुणबी समाज जोयडा तालुक्यात मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहे. शेतीप्रधान जोयडा तालुक्यातील शेतकरी अल्पधारक भूधारक आहेत. शेतीचा जोडधंदा म्हणून ते घराच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीत कंदमुळांचे पीक घेतात. पावसाळा सुरु होताच कंदमुळांची लागवड केली जाते. साधारणपणे डिसेंबर महिन्यात कंदमुळाचे पीक घेतले जाते. शेण, जंगलातील पाने आणि गांडुळखत वापरुन सेंद्रिय पद्धतीने कंदमुळाचे पीक घेतले जाते. त्यामुळे कंदमुळे आरोग्यदायी ठरतात. व्यवस्थितरित्या जतन केल्यास ही कंदमुळे दोन ते तीन वर्षे टिकून राहतात, असे सांगण्यात आले. उपवासाच्या वेळी कंदमुळांचा पर्यायी फूड म्हणून वापर केला जातो.