कणबर्गी गावची बससेवा विस्कळीत
विद्यार्थीवर्गाला शाळा-महाविद्यालयाला पोहोचायला उशीर
सांबरा : कणबर्गी गावची बससेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थीवर्गाला शाळा व महाविद्यालयाला पोहोचायला उशीर होत आहे. त्यामुळे येथील बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. कणबर्गी गावाला एक स्वतंत्र बस असून दिवसभरात अनेक बसफेऱ्या होतात. मात्र दुसरा बसथांबा व तिसरा बसथांबा येथील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मुचंडी, खनगाव, सुळेभावी आदी गावच्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. मात्र सदर बसेस आधीच भरून येत असल्याने येथे कधी थांबतात तर कधी तशाच बेळगावकडे निघून जातात. तसेच एखाद्या वेळेला बस थांबलीच तर विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजावर उभे राहून बेळगावपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. व येथे बस न थांबल्यास पुढील बसची वाट पाहत बसथांब्यावर तिष्ठत थांबावे लागत आहे. अशाप्रकारामुळे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयाला वेळेवर पोहोचता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बससाठी विद्यार्थी वर्गाला शाळेच्या वेळेच्या दोन ते अडीच तास आधीच येऊन थांबावे लागत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन गावाला जादा बसफेऱ्या सोडाव्यात. तसेच इतर गावाहून येणाऱ्या बसेसना दुसरा थांबा व तिसरा थांबा येथे थांबण्यासाठी सक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थी व प्रवासी वर्गातून होत आहे.