कणबर्गी मराठी शाळेच्या छताला गळती
छतावर पत्रे बसविण्याची पालकांची मागणी
बेळगाव : कणबर्गी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या छताला गळती लागली आहे. तीन ते चार वर्गखोल्यांमध्ये गळती लागल्याने या वर्गाव्यतिरिक्त इतर वर्गांमध्ये अभ्यास घेतला जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे संपूर्ण शाळेच्या छताला पत्रे बसविण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे. कणबर्गी शाळेमध्ये पटसंख्या शंभरहून अधिक असतानाही शाळेच्या दुरुस्तीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ज्या शाळांमध्ये छताला गळती आहे, त्या शाळांवर पत्रे बसविले जात आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कणबर्गी शाळेतील पालकांनी पत्रे बसविण्याची मागणी केली होती. परंतु, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून चालढकल सुरू होती. सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने छताची गळतीही वाढली आहे. वर्गाच्या भिंती ओल्या होत असून छतामधून सतत पाणी विद्याथ्यर्विंर पडत आहे. त्यामुळे गळके वर्ग बंद ठेवावे लागत आहेत. एकाच वर्गात दोन इयत्तांचे वर्ग भरवावे लागत असल्याने शिक्षण विभागाने त्वरित पत्रे बसविण्याची मागणी पालकांमधून होत आहे.