For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमरान गुलामचे कसोटी पदार्पणात शतक

06:55 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कमरान गुलामचे कसोटी पदार्पणात शतक
Advertisement

इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी पहिला दिवस : पाक प. डाव 5 बाद 259, आयुबचे अर्धशतक

Advertisement

► वृत्तसंस्था / मुल्तान

मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत यजमान पाकने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात दिवसअखेर 5 बाद 259 धावा जमविल्या. पाक संघात कसोटी पदार्पण करणाऱ्या कमरान गुलामने शानदार शतक (118) तर सईम आयुबने अर्धशतक (77) झळकविले.

Advertisement

या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून पाकवर आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर त्यांचे आघाडीचे दोन फलंदाज केवळ 19 धावांत तंबूत परतले. डावातील आठव्या षटकात जॅक लीचने सलामीच्या अब्दुल्ला शफीकचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. त्यानंतर लीचने पाकला आणखी एक धक्का देताना कर्णधार शान मसूदला क्रॉलेकरवी झेलबाद केले. मसूदने 3 धावा जमविल्या. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 19 अशी होती.

शतकी भागिदारी

सईम आयुब आणि कमरान गुलाम यांनी पाकचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 149 धावांची भागिदारी केली. उपाहारावेळी पाकने 29 षटकात 2 बाद 79 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतर सईम आयुबने आपले अर्धशतक 97 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने झळकविले तर कमरान गुलामने आपले अर्धशतक 104 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 206 चेंडूत नोंदविली. चहापानापूर्वी पाकने आपला तिसरा गडी गमविला. पॉटस्ने सईम आयुबला स्टोक्सकरवी झेलबाद केले. आयुबने 160 चेंडूत 7 चौकारांसह 77 धावा जमविल्या. चहापानावेळी पाकने 57 षटकात 3 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाकने 94 धावा जमविताना 1 गडी गमविला. चहापानावेळी कमरान गुलाम 75 धावांवर खेळत होता.

कमरान गुलामचे शतक

चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये कमरान गुलामने आपले कसोटीतील पहिले शतक पदार्पणातच झळकविले. त्याने 192 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. मात्र खेळाच्या शेवटच्या सत्रात पाकचे दोन फलंदाज बाद झाले. कार्सेने सौद शकीलला स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने 4 धावा जमविल्या. अलिकडच्या कालावधीत फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असलेल्या मोहम्मद रिझवानने कमरान गुलामसमवेत पाचव्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी शोएब बशीरने कमरान गुलामचा त्रिफळा उडवून आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. कमरान गुलामने 224 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 118 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवान 4 चौकारांसह 37 तर सलमान आगा 5 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे जॅक लीचने 92 धावांत 2 तर पॉटस्, शोएब बशीर आणि कार्से यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकचे द्विशतक 413 चेंडूत तर 250 धावा 518 चेंडूत नोंदविल्या गेल्या.

आश्विनकडून गुलामचे कौतुक

भारताचा अष्टपैलु रवीचंद्रन आश्विनने पाकचा 29 वर्षीय फलंदाज कमरान गुलामच्या कामगिरीचे प्रसार माध्यमांशी बोलताना खास कौतुक केले. कमरान गुलामने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करताना हे महत्वाचे शतक झळकविण्याचा पराक्रम केला. संघावर दडपण असताना गुलामचे हे शतक अधिक महत्वाचे राहिले. इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यात माजी कर्णधार बाबर आझमला संघातून वगळण्यात आल्याने साहजिकच कमरान गुलामवर अधिक जबाबदारी पडली होती. पाकच्या कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये कसोटी पदार्पणात शतक झळकविणारा कमरान गुलाम हा 13 वा फलंदाज आहे. पाकच्या भूमीवर कसोटी पदार्पणात शतक नोंदविणारा 11 वा तसेच मुल्तानच्या खेळपट्टीवर शतक झळकविणारा कमरान गुलाम दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी म्हणजे 2001 साली पाकच्या तौफीक उमरने बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक (104) झळकविले होते. कमरान गुलामच्या या शतकामुळे पाकला पहिल्या डावात बऱ्यापैकी धावसंख्या गाठता येईल तसेच त्यांना या मालिकेत इंग्लंडशी बरोबरी करण्याची संधी सुद्धा मिळू शकेल, असेही आश्विनने म्हटले आहे.

संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव 90 षटकात 5 बाद 259 (कमरान गुलाम 118, सईम आयुब 77, मोहम्मद रिझवान खेळत आहे 37, सलमान आगा खेळत आहे 5, शफीक 7, शान मसूद 3, सौद शकील 4, अवांतर 8 लीच 2-92, पॉटस् 1-36, कार्से 1-14, शोएब बशीर 1-66).

Advertisement
Tags :

.