कमिंदू मेंडिसचे शतक, श्रीलंका 7/302
कुसल मेंडिसचे अर्धशतक, विल्यम ओरुरकेचे 3 तर ग्लेन फिलिप्सचे 2 बळी
वृत्तसंस्था/ गॅले (श्रीलंका)
येथील गॅले क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान श्रीलंकेने 88 षटकांत 7 बाद 302 धावा जमवल्या. सुरुवातीला पडझड झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज कमिंदू मेंडिसने शानदार शतकी खेळीच्या जोरावर लंकेने त्रिशतकी मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रमेश मेंडिस 14 धावांवर खेळत होता.
प्रारंभी, श्रीलंकन कर्णधार धनजंय डी सिल्वाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. 106 धावांत त्यांनी चार विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर दिमुथ करुणारत्ने चौथ्या षटकांत बाद झाला. यानंतर पथुम निसांका (27) व दिनेश चंडिमल (30), अनुभवी अँजेलो मॅथ्यूज (36) हे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कर्णधार डी सिल्वालाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 11 धावा काढून तो तंबूत परतला. या कठीण परिस्थतीत कमिंदू मेंडिस व कुसल मेंडिस जोडीने संघाचा डाव सावरला. या जोडीने किल्ला लढवताना सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी साकारली. कमिंदू मेंडिसने शानदार शतकी खेळी साकारताना 173 चेंडूत 11 चौकाराच्या मदतीने 114 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 68 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 50 धावा फटकावल्या. अर्धशतकानंतर ग्लेन फिलिप्सने त्याला बाद करत लंकेला सातवा धक्का दिला. दिवसाचा खेळ संपण्यास दोन षटके बाकी असताना कमिंदू मेंडिसला एजाज पटेलने बाद करत न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकेने 88 षटकांत 7 गडी गमावत 302 धावा केल्या होत्या. रमेश मेंडिस 14 तर प्रभात जयसूर्या 0 धावावर खेळत होते. न्यूझीलंडकडून विल्यम ओरुरकेने 3, ग्लेन फिलिप्सने 2, टिम साउथीने 1 आणि एजाज पटेलने 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका पहिला डाव 88 षटकांत 7 बाद 302 (निसांका 27, चंडिमल 30, मॅथ्यूज 36, कमिंदू मेंडिस 114, कुसल मेंडिस 50, रमेश मेंडिस खेळत आहे 14, ओरुरके 3 तर फिलिप्स 2 बळी).
कमिंदू मेंडिसचा अनोखा विक्रम
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज कमिंदू मेंडिस पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीसाठी धावून आला. शतकी खेळीसह त्याने या कसोटीत अनोखा विक्रम नोंदवला. कमिंदूच्या कारकिर्दीतील ही केवळ सातवी कसोटी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सातही कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यासह त्याने पदार्पणापासून सलग कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याच्या पाकिस्तानच्या सौद शकीलच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. सौद शकीलने गेल्या वर्षी जुलैमध्ये हा विश्वविक्रम केला होता. शकीलने त्यावेळी भारताचे सुनील गावसकर, वेस्ट इंडिजचे बेसिल बुचर, पाकिस्तानचा सईद अहमद आणि न्यूझीलंडचा बर्ट सटक्लिफ यांचे विक्रम मोडीत काढले होते. या चौघांनी पदार्पण केल्यापासून सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.