For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमला हॅरिस यांनी मिळविली अध्यक्षपदाची उमेदवारी

06:58 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कमला हॅरिस यांनी मिळविली अध्यक्षपदाची उमेदवारी
Advertisement

डेमोक्रटिक पार्टीकडून अधिकृत घोषणा : नोव्हेंबरमध्ये निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी मंगळवारी डेमोक्रेटिक पार्टीकडून अध्यक्षपदासाठी अधिकृत स्वरुपात उमेदवारी प्राप्त केली आहे. याचबरोबर त्या देशाच्या एका मोठ्या राजकीय पक्षाकडुन अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय-आफ्रिकन महिला ठरल्या आहेत.

Advertisement

59 वर्षीय हॅरिस नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत माजी अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा मुकाबला करणार आहेत. मागील शुक्रवारी हॅरिस यांना सत्तारुढ डेमोक्रेटिक पार्टीने आगामी अध्यक्षीय निवडणुकीसाठी स्वत:चा उमेदवार घोषित पेले होते. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक उमेदवार होता आल्याने मला गौरवाची अनुभूती होत आहे. हे निवडणूक अभियान लोकांना देशप्रेमाने प्रेरित होत एकजूट करण्यासाठी असल्याचे हॅरिस यांनी त्यावेळी म्हटले होते.

बिडेन यांची माघार

मागील महिन्यात अध्यक्ष जो बिडेन यांनी आगामी निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. यानंतर भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष हॅरिस यांना सत्तारुढ डेमोक्रेटिक पार्टीच्या 2024 चा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.

4567 डेलिगेट्सचे समर्थन

डेमोक्रेटिक नॅशनल कन्वेंशनच्या डेलिगेट्सच्या पाच दिवसीय ऑनलाइन मतदानानंतर हॅरिस यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. 99 टक्के डेलिगेट्सनी हॅरिस यांच्या बाजूने मतदान केले. देशभरातील 4567 डेलिगेट्सनी हॅरिस यांच्याकरता मतदान केले असल्याची माहिती डेमोक्रेटिक पार्टीने मंगळवारी दिली आहे.

हॅरिस यांची आई भारतीय वंशाची

कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ओकलँडमध्ये 20 ऑक्टोबर 1964 रोजी झाला होता. श्यामला गोपालन आणि डोनाल्ड हॅरिस अशी त्यांच्या आईवडिलांची नावे आहेत. गोपालन या वयाच्या 19 व्या वर्षी भारतातून अमेरिकेत  दाखल झाल्या होत्या. श्यामला गोपालन या संशोधिका होत्या, तर डोनाल्ड हॅरिस हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. डोनाल्ड हे मूळचे जमैका येथील होते.

Advertisement
Tags :

.