For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमला हॅरिस लढविणार अध्यक्षीय निवडणूक?

06:22 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कमला हॅरिस लढविणार अध्यक्षीय निवडणूक
Advertisement

डेमोक्रेट्सकडून मागणी : चालू आठवड्यात बिडेन उमेदवारी नाकारणार असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत मागील आठवड्यात झालेल्या अध्यक्षीय चर्चेनंतर जो बिडेन यांच्या डेमोक्रेटिक पार्टीचे नेते अध्यक्षीय निवडणुकीचा उमेदवार बदलण्याची मागणी करत आहेत. टेक्सासचे खासदार लॉयड डॉगेट यांनी जाहीरपणे बिडेन यांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी जाहीरपणे केली आहे. दुसरीकडे अमेरिकन पत्रकार आणि ट्रम्प समर्थक टकर कार्लसन यांनी अध्यक्ष जो बिडेन यांना डिमेंशिया (विस्मृतीचा आजार) असल्याचा दावा केला आहे. डेमोक्रेट्स लवकरच बिडेन यांच्या जागी कमला हॅरिस यांना अध्यक्षीय पदासाठी उमेदवार करू शकतात.

Advertisement

अमेरिकेत 28 जून रोजी झालेल्या अध्यक्षीय चर्चेदरम्यान बिडेन हे अनेकदा अडखळत असल्याचे आणि सुस्तावल्याचे दिसून आले हेते. विश्लेषकांनुसार ट्रम्प यांच्या विरोधातील डिबेटमध्ये ते पराभूत झाले होते. तेव्हापासून पक्षात त्यांचे वय आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. एका सर्वेक्षणानुसार पक्षातील प्रत्येकी 3 पैकी एक नेता आता बिडेन यांनी चालू आठवड्यात अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीतून स्वत:चे नाव मागे घ्यावे असे मानू लागला आहे.

दौऱ्यांमुळे थकवा : बिडेन

डिबेटनंतर डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्यांना आता बिडेन निवडणुकीत विजयी होऊ शकत नसल्याचे वाटू लागले आहे. पक्षात त्यांच्या विरोधातील सूर आता जोर पकडू लागला आहे. हे पाहता बिडेन हे आता पक्षाचे खासदार आणि गव्हर्नरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. बिडेन यांनी डिबेटमध्ये चांगली कामगिरी न केल्याप्रकरणी स्पष्टीकरणही दिले. डिबेटपूर्वी अनेक देशांच्या दौऱ्यावर गेलो हेतो. सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांमुळे मायदेशी परतेपर्यंत थकून गेलो होतो असे बिडेन यांनी म्हटले आहे. व्यासपीठावर ट्रम्प यांच्यासोबत डिबेट करताना झोप येत होती. स्वत:च्या सहकाऱ्यांचे म्हणणे न ऐकण्याचे परिणाम मला भोगावे लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

देशाच्या कल्याणासाठी निर्णय घ्यावा लागणार

बिडेन हे अत्यंत जिद्दी आहेत असे डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या नेत्यांनी सध्या त्यांना एकाकी पाडले आहे. केवळ डिबेटचा मुद्दा असता तर या स्थितीतून पक्ष बाहेर पडू शकला असता. परंतु अनेक मुद्दे बिडेन याहंच्या अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. बिडेन यांचा निर्णय सिनेटमध्ये किती जागा मिळतील केवळ हे निश्चित करणार नाही, तर व्हाइट हाउस आणि पुढील 4 वर्षांसाठी देशाचे भविष्य देखील निश्चित करणार असल्याचे इलिनॉय प्रांतातील खासदार माइक किग्ले यांनी म्हटले आहे.

मानसिक संतुलनावरुन दावा

बिडेन यांना डिमेंशिया आजार असल्याचे प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक लपवत आहेत.  बिडेन यांचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचा मी दावा करू शकतो. डेमोक्रेटिक पार्टीचे नेते ही गोष्ट जाणून आहेत. बिडेन यांना अध्यक्षीय निवडणुकीतून हटवावे लागणार आहे. डेमोक्रेटिक पार्टीचे नेते समजुतदार आहेत, ते लवकरच योग्य निर्णय घेतील. कमला हॅरिस देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरू शकतात असे उद्गार अमेरिकेतील पत्रकार टकर कार्लसन यांनी काढले आहेत.

ओबामांसंबंधी दावा

माजी अध्यक्ष बराक ओबामा हे अनेक लोकांसमोर बिडेन हे अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होणार नसल्याचे सांगत आहेत. परंतु ओबामा कुणाचे समर्थन करत आहेत हे जाहीर करणे टाळत आहेत. ओबामा आणि बिडेन यांच्यातील संबंध कधीच मधूर नव्हते. एकेकाळी दोघेही परस्परांचे टीकाकार होते. ट्रम्प आता केवळ रिपब्लिकन उमेदवार नव्हे तर संभाव्य अध्यक्ष ठरत आहेत असा दावा कार्लसन यांनी केला.

Advertisement
Tags :

.