ट्रम्पच्या तुलनेत कमला हॅरिस आघाडीवर
अमेरिकेत लवकरच अध्यक्षीय निवडणूक : सर्वेक्षणात डेमोक्रेटिक उमेदवार सरस
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेत यंदा होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी रॉयटर्स/इप्सोस पोलमध्ये कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी मिळविल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून यानुसार डेमोक्रेट उमेदवार कमला हॅरिस यांना 45 टक्के लोकांचे समर्थन प्राप्त आहे. तर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना 41 टक्के लोकांचा पाठिंबा आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात हॅरिस यांनी केवळ एक टक्क्यांची आघाडी मिळविली होती.
नव्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीमुळे हॅरिस समर्थकांचा उत्साह वाढला आहे. सर्वेक्षणात सामील डेमोक्रेटिक नोंदणीकृत मतदारांपैकी 73 टक्के जणांनी हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे उत्साह वाढला असल्याची कबुली दिली आहे. महिला आणि हिस्पॅनिक (स्पॅनिश भाषिक) मतदारांदरम्यान कमला हॅरिस यांची मोठी लोकप्रियता असल्याचे समोर आले आहे. महिला आणि हिस्पॅनिक मतदारांप्रकरणी कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर 13 अंकांची आघाडी घेतली आहे. तर श्वेतवर्णीय मतदारांनी हॅरिस यांच्या तुलनेत ट्रम्प यांना अधिक पसंती दर्शविली आहे.
हे नवे सर्वेक्षण 8 दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले होते. 81 वर्षीय अध्यक्ष जो बिडेन यांनी 21 जुलै रोजी स्वत:ची अध्यक्षीय प्रचारमोहीम संपुष्टात आणली होती. त्यापूर्वी बिडेन हे ट्रम्प यांच्या तुलनेत खूपच कमकुवत उमेदवार दिसून येत होते. परंतु बिडेन यांनी माघार घेतल्यावर आणि हॅरिस यांना उमेदवारी मिळाल्यावर चित्र बदलले आहे. राष्ट्रीय सर्वेक्षण आणि महत्त्वपूर्ण प्रांतांमध्ये हॅरिस यांना आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे.