कलखांब ग्राम पंचायत कार्यालय पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न
परिसरात खळबळ : बिअर बाटलीत पेट्रोल भरून मारा, सीसीटीव्हीची मोडतोड
प्रतिनिधी/ बेळगाव
पेट्रोलबॉम्बने ग्राम पंचायत इमारत पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कलखांब, ता. बेळगाव येथे घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली असून, मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कलखांबचे पीडीओ गोपाल सिद्धाप्पा गुडसी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 326(बी), 238(ए) व सार्वजनिक मालमत्ता संरक्षण कायद्यांतर्गत अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खिडकीच्या काचांचे नुकसान
शुक्रवार दि. 8 नोव्हेंबरच्या रात्री 9 ते शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 या वेळेत ही घटना घडली आहे. बिअर बाटलीत पेट्रोल घालून पेट्रोल बॉम्बसारखा त्याचा वापर करून ग्राम पंचायत इमारतीच्या खिडकीवर तो टाकण्यात आला आहे. त्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. हे कृत्य सीसी कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून कॅमेराही काढून टाकण्यात आला आहे.
आतील काही वस्तूंना आग
शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. शुक्रवारी गावात कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या वादावादीचे पर्यवसान या घटनेत झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत. पेट्रोलबॉम्बच्या हल्ल्यातून कागदपत्रे सुरक्षित आहेत. पण, खिडकी व आतील काही वस्तूंना आग लागल्याचे सांगण्यात आले.