कलिंगा लान्सर्स, ओडिशा वॉरियर्स विजयी
वृत्तसंस्था / राऊरकेला
येथे सुरू असलेल्या हिरो पुरस्कृत हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील झालेल्या विविध सामन्यांत वेदांता कलिंगा लान्सर्सने दिल्ली पायपर्सचा तर महिलांच्या विभागात ओडिशा वॉरियर्सने श्राची रार बंगाल टायगर्सचा पराभव केला.
पुरुषांच्या विभागातील झालेल्या सामन्यात कलिंगा लान्सर्सने पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने दिल्ली पायपर्सचा पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दिल्ली पायपर्सने कलिंगा लान्सर्सवर 4-1 अशी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर कलिंगा लान्सर्सने पिछाडीवरुन मुसंडी मारत निर्धारीत वेळेत 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला आणि कलिंगा लान्सर्सने दिल्ली पायपर्सचा 3-2 असा पराभव करत पूर्ण गुण वसुल केले.
कलिंगा लान्सर्सतर्फे अॅलेक्झांडर हेन्ड्रीक्सने 13 व्या आणि 52 व्या मिनिटाला तर थिएरी ब्रिंकमनने 35 व्या आणि 47 व्या मिनिटाला तसेच अंगद वीरसिंगने 49 व्या मिनिटाला गोल केले. तत्पूर्वी दिल्ली पायपर्सतर्फे टॉमस डोमेनीने 18 व्या आणि 20 व्या मिनिटाला, कोरे वेअरने 21 व्या मिनिटाला, कोजी यामासाकीने 23 व्या आणि दिलराज सिंगने 37 व्या मिनिटाला गोल नोंदविले. हेन्ड्रीक्सच्या 52 व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलामुळे कलिंगा लान्सर्सने निर्धारीत वेळेत दिल्ली पायपर्सशी बरोबरी साधली. पेनल्टी शुटआऊटमध्ये हेन्ड्रीक्सच्या पेनल्टी स्ट्रोकवरील फटक्यामुळे कलिंगा लान्सर्सने दिल्ली पायपर्सवर आघाडी मिळविली. त्यानंतर टोबी रेनॉल्ड्स कॉट्रेलने दिल्ली पायपर्सचा पेनल्टी शुटआऊटमधील फटका अडविल्याने कलिंगा लान्सर्सला विजय नोंदविता आला.
महिलांच्या विभागातील झालेल्या सामन्यात ओडिशा वॉरियर्सने बंगाल टायगर्सचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात ओडिशा वॉरियर्सतर्फे जेनसेनने 18 व्या आणि 47 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. मिचेली फिलेटने 16 व्या तसेच नेहा गोयलने 58 व्या मिनिटाला गोल केले. बंगाल टायगर्सतर्फे एकमेव गोल उदिताने 30 व्या मिनिटाला केला. रांचीमध्ये तीन दिवसांपूर्वी या दोन संघामध्ये झालेला सामना 1-1 बरोबरीत राहिला होता त्यानंतर ओडिशा वॉरियर्सने पेनल्टी शुटआऊटमध्ये बंगाल टायगर्सला पराभूत केले होते.