काळेनट्टी गाव रोजगार हमी योजनेपासून वंचित
मार्कंडेयनगर ग्राम पंचायतीला महिलांचा घेराव : मजदूर नवनिर्माण संघाच्या पुढाकारामुळे आंदोलन, सरकारचे गावाकडे दुर्लक्ष का?
वार्ताहर /किणये
सर्वसामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सरकारमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सध्या तालुक्मयाच्या बऱ्याच ग्राम पंचायतीमार्फत महिला व पुऊषांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. मात्र तालुक्मयाच्या पश्चिम भागातील मार्कंडेयनगर ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील काळेनट्टी हे गाव रोजगार हमी योजनेपासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिला ग्राम पंचायतीचा दरवाजा ठोठावत आहेत. मात्र संबंधित ग्रामपंचायतीमधील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अखेर मजदूर नवनिर्माण संघाच्या पुढाकाराने काळेनट्टी गावच्या महिलांनी मार्कंडेयनगर ग्राम पंचायतीला घेराव घालून जाब विचारला आहे. सोमवारी सकाळी गावातील महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या आणि त्यांनी मार्कंडेयनगर ग्राम पंचायतीला घेरावा घातला.
यावेळी आमच्या गावाला रोजगार हमी योजना का उपलब्ध नाही, असा जाब विचारला. मात्र पीडीओ अनुपस्थित असल्यामुळे सेव्रेटरी गुरव यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले व निवेदन दिले. आपला भाग विकसित झाला असे दाखविण्यात येते मात्र काळेनट्टीसारख्या गावात रोजगार हमी योजना राबविली जात नाही. ही फार गांभीर्याची गोष्ट आहे. यावर खरोखरच त्या भागातील ग्राम पंचायत सदस्यांचे दुर्लक्ष झाले आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. मजदूर नवनिर्माण संघातर्फे मार्कंडेय ग्रामपंचायतीकडे गावातील महिला व पुऊषांचे आधारकार्ड व कागदपत्रे देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत दोनवेळा कागदपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती मजदूर नवनिर्माण संघाचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी दिली. गावातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे मजदूर नवनिर्माण संघामार्फत आम्ही त्यांच्यासाठी लढा उभारला आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असेही राहुल पाटील यांनी सांगितले. सोमवारी सकाळी मजदूर नवनिर्माण संघाच्यावतीने ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राहुल पाटील यांच्यासोबत मलप्रभा चन्नीकोपी, सरोजा नावगेकर, भीमव्वा बण्णार, रेणुका नाईकण्णांवर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
यापूर्वी आम्ही दोनवेळा मार्कंडेयनगर ग्रामपंचायतीकडे रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात सर्व कागदपत्रे दिली आहेत. तरीही ग्राम पंचायतीकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. आमच्या गावातीलच महिलांना रोजगार का उपलब्ध होत नाही? आम्ही दाद कुणाकडे मागायची? ग्राम पंचायतीने गावातील महिला व पुऊषांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- भीमव्वा बण्णार
आमच्यावर उपासमारीची वेळ
आजूबाजूच्या गावातील बऱ्याच महिला रोजगार हमी योजनेअंतर्गत रोज कामाला जातात. मात्र आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला ग्रामपंचायतीमधून रोजगार उपलब्ध होत नाही. सरकारची ही अशी कोणती योजना आहे, जी आमच्या गावाला लागू होत नाही व अन्य गावांमध्ये मात्र रोजगार उपलब्ध होतो, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी.
- सरोजा नावगेकर