कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळंबा उपनगराला प्रतीक्षा भाजी मंडईची

11:16 AM May 09, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कळंबा / सागर पाटील  :

Advertisement

पश्चिम भाग उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंबा परिसरात सुसज्ज भाजी मंडई उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी व विक्रेते फुटपाथ, मोकळ्या जागा व मुख्य रस्त्याच्या कडेला बसून भाजी विक्री करत आहेत. यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची आणि शौचालय सुविधांची कमतरता तसेच वाहतुकीतील अडथळे हा रोजचा त्रास बनला आहे. कळंबा, बापूरामनगर, कात्यायनी, गिरगाव, नंदवाळसह परिसरातील येणारे शेतकरी दररोज ताजी भाजी व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी येथे गर्दी करतात. परिसरात दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असली तरी उपनगरात विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी बाजार कट्टे अथवा मंडईसारखी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

Advertisement

पावसाळा असो वा उन्हाळा, शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला थेट उघड्यावर बसावे लागते. ताज्या भाज्यांवर पावसाचे थेंब पडून नुकसान होते, तर उन्हात माल वाया जाण्याची भीती असते. त्यात पिण्याच्या पाण्याचा अभाव व शौचालय सुविधेची अनुपलब्धता यामुळे विक्रेत्यांची कुचंबणा होते.

ग्राहक थेट रस्त्यावर वाहन लावून भाजी खरेदी करतात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.

79 आणि 80 या प्रभागांचा समावेश असलेल्या कळंबा उपनगराची लोकसंख्या आता 20 हजारांहून अधिक झाली आहे. परिसरात 50 हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,20 पेक्षा अधिक मंगल कार्यालये व अॅग्रो टुरिझम सेंटर असल्याने भाजीपाला व दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सुसज्ज भाजी मंडईची गरज दिवसेंदिवस अधिक तीव्रतेने जाणवत आहे.

कळंबा परिसरातील वाढती लोकसंख्या, बाजाराची मागणी आणि वाहतुकीची अडचण लक्षात घेता, तातडीने सुसज्ज भाजी मंडई उभारणे अत्यावश्यक आहे. शेतकरी, महिला विक्रेते आणि ग्राहकांच्या सोयीसाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

रस्त्यावर भाजी विक्रीमुळे या परिसरात शंभरहून कॉलनी या रस्त्याला जोडतात. तसेच राधानगरीला जाणारे वाहनधारक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे सायंकाळी गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. महापालिकेने तातडीने भाजी मंडई उभारली पाहिजे.

                                                                                                                                 -शिवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

पिण्याचे पाणी व शौचालयाच्या अभावामुळे विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. बाजार कट्टे उपलब्ध केल्यास त्यांचे हाल कमी होतील.

                                                                                                                                   -विजयकुमार कांबळे, स्थानिक नागरिक.

स्वस्त, ताजी भाजी मिळत असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पण विक्रेत्यांसाठी भाजी विक्रीची योग्य व्यवस्था नाही.

                                                                                                                                                 -अमोल साळोखे, नागरिक

कळंबा परिसरातील हॉटेल्स व मंगल कार्यालयांची मागणी वाढली आहे. मात्र सुसज्ज भाजी मंडई नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावरच आपला माल विकावा लागतो महपालिकेने याकडे लक्ष द्यावे

                                                                                                                                        -महादेव पाटील, व्यावसायिक

घराजवळ ताजी भाजी मिळते हे जरी सोयीचे असले, तरी मर्यादित वेळेमुळे विक्रेत्यांना व ग्राहकांना अडचणी येतात. महापालिकेने लवकरात लवकर भाजी मंडई उभारावी.

                                                                                                                                               -स्मिता कुंभार, गृहिणी

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharatSocialMedia
Next Article