जुना कळंबा नाका नशेखोरांच्या दहशतीखाली! राजेंद्रनगरमधील तरुणांची वाढली गुंडगिरी
: किरकोळ विक्रेत्यांना शुल्लक कारणावरुन दाखवला जातोय चाकूचा धाक; पोलिसांनाही शिविगाळ करत केली अरेरावी; पोलिसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे स्थानिक तरुण संतप्त
कोल्हापूर प्रतिनिधी
राजेंद्रनगरमधील नशेखोर तरुणांच्या दहशतीखाली सध्या जुना कळंबा नाका परिसर आहे. नशेखोरांचा वाढलेला वावर येथील किरकोळ विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शुल्लक कारणावरुन येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वारंवार चाकुचा धाक दाखवला जात आहे. बुधवारी रात्री उशिराही नशेखोर दहशत माजवत असताना येथे आलेल्या गस्त पथकातील पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतल्याने येथे जमलेल्या स्थानिक तरुणांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
जुना कळंबा नाका येथील साई मंदिर परिसर, कात्यायणी कॉम्प्लेक्स येथे सध्या राजेंद्रनगरमधील फाळकूट दादांचा वावर वाढला आहे. नशेमध्ये असणाऱ्या या तरुणांकडून येथील खाद्यपदार्थ व्रिक्रेते, वाहनधारक यांना अरेरावी सुरु असते. सध्या किरकोळ कारणावरुन त्यांच्याकडून चाकू, कोयता, एडक्याचा धाक दाखवण्याचा प्रकार सुरु आहे. वरचेवर हे प्रकार सुरु आहेत, मात्र तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने या प्रकारांकडे कानाडोळा सुरु आहे. त्यामुळे या फाळकूट दादांकडून दहशत माजवण्याचे प्रकार वाढतच आहेत.
बुधवारी रात्री उशिरा येथील एका टॅटूशॉप चालकासोबत दोन नशेखोर तरुणांचा वाद सुरु होता. हा प्रकार समजताच येथे स्थानिक तरुण मोठयासंख्येने जमले होते. याचदरम्यान येथे जुना राजवाडा पोलिसांचे गस्त पथक आले. त्यांनी प्रथम या दोन नशेखोर तरुणांना अडवले. मात्र या नशेखोरांनी हातामध्ये दगड घेत पोलिसांनाच अरेरावी करण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली. पोलिसांना अरेरावी करुन हे दोन नशेखोर तेथून निघून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचे धारिष्ट दाखवले नाही. याप्रकारामुळे स्थानिक तरुण चांगलेच संतापले. तरुणांनी तुम्ही नशेखोरांना तब्यात का घेतले नाही याचा जाब विचारत घेरावा घातला. याप्रकारावरुन स्थानिक तरुणांनी बराचकाळा पोलिसांना धारेवर धरले.
साहेब तुम्हाला आवरायला जमतंय काय बघा...
नशेखोरांकडून वारंवार सुरु असलेल्या त्रासाला स्थानिक तरुण मंडळांचे कार्यकर्तेही वैतागले आहेत. बुधवारी रात्रीचा प्रकार समजताच स्थानिक तरुण मोठयासंख्येने जुना कळंबा नाका येथे एकत्र आले. मात्र यावेळी पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भुमिकेमुळे तरुण चांगलेच संतापले. तरुणांनी साहेब या नशेखोरांना तुम्हाला आवरायला जमतंय काय बघा, आम्हाला कायदा हातात घ्यालया लावू नका, असा इशारा दिला.
भाजी मार्केट, कात्यायनी कॉम्प्लेक्समध्ये वावर
कळंबा भाजी मार्केट नशेखोरांचा आढ्ढा बनला आहे. तर कात्यायनी कॉम्प्लेक्स येथे त्यांचा वावर वाढला आहे. नशेखोरांबाबत पोलिस प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे. मात्र पोलिसांकडून होत असलेल्या दूर्लक्षामुळे कळंबा परिसरात नशेखोरांचा वावर वाढला आहे.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना उगारले हत्यार
नशेखोर येथील खाऊ गल्लीमध्ये खाद्यपदार्थ खातात नंतर संबंधित विक्रेत्यांने पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर हत्यार उगारल्याचे प्रकारही येथे घडले आहे. काही दिवसांपुर्वी येथील एका विव्रेत्याच्या हातावर चाकू हल्ला तर एकावर कोयता उगारल्याची घटना देखिल घडली आहे. त्यामुळे नशेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांमधून होत आहे.
रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री सुरु
येथील खाऊ गल्लीतील काही खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. यामुळे मद्यपी, नशेखोर तरुण येथे खाद्यपदार्थ खाण्यासाठी येत असतात. या गाड्यांवरही वादाचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लवकर बंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.