For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News: कळंबा कात्यानीतील फार्महाउसला विकेंडसाठी पसंती

04:51 PM Nov 22, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news  कळंबा कात्यानीतील फार्महाउसला विकेंडसाठी पसंती
Advertisement

                         कोल्हापूरकरांना मिळतोय हाकेच्या अंतरावर निसर्गोत्सवाचा अनुभव: सेकंड होम डेस्टिनेशन 

Advertisement

सागर पाटील,

कळंबा:
कोल्हापूर शहराचा गजबजाट, वाहतूक आणि प्रदूषणापासून थोडी उसंत मिळवण्यासाठी आता कोल्हापूरकरांना लांबच्या पर्यटनस्थळी धावण्याची गरज उरलेली नाही. शहरालगत असलेल्या कळंबा–कात्यायनी परिसराचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत मोठ्या वेगाने बदलला आहे. एकेकाळी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ओळखला जाणारा हा पट्टा आज ‘लक्झरी फार्महाऊसेस’, ‘सेकंड होम’ आणि आधुनिक इव्हेंट डेस्टिनेशन म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहे. हिरवाईने नटलेलं वातावरण, शहरापासून अवघं १५–२० मिनिटांचं अंतर आणि शांततेचा अनुभव या तिघांच्या संगमामुळे हा परिसर कोल्हापूरकरांचा ‘हायक्लास वीकेंड ठिकाण बनले आहे. 

‘वीकेंड होम’ ते ‘स्टेटस सिम्बॉल’

कोल्हापूर शहराचा विस्तार मोठ्या वेगाने होत असताना उच्चभ्रू, डॉक्टर, उद्योजक आणि व्यावसायिक वर्ग शहरालगतच आपली मोकळी व खासगी जागा असावी, अशी इच्छा बाळगू लागला आहे. कळंबा तलाव व कात्यायनीच्या डोंगररांगात असलेली घनदाट हिरवळ या भागाला नैसर्गिक सौंदर्याची अमूल्य देणगी देते. परिणामी या पट्ट्यात जमिनींची मागणी वाढली असून अनेकांनी येथे भव्य बंगले, आधुनिक फार्महाऊस आणि ‘रिसॉर्ट-टाइप होम्स’ उभारले आहेत.

Advertisement

या ठिकाणांचे वैशिष्ट्य एवढेच नाही की ते राहण्यासाठी आकर्षक आहेत; तर आता हे ठिकाण ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले आहे. आठवडाभर व्यस्त धकाधकीत असणारे नागरिक शनिवार–रविवार कुटुंबासह येथे मुक्कामी राहणे पसंत करत आहेत.

शहारापासुन अगदी हाकेच्या अंतरावरील ठिकाण

काही वर्षांपूर्वी लग्नसोहळे व कौटुंबिक कार्यक्रमासाठी एसी मंगल कार्यालयांचीच पसंती होती. मात्र, आता हा ट्रेंड पूर्णतः बदलला आहे. “चार भिंतींमध्ये समारंभ नको, मुक्त आकाशाखाली निसर्गाच्या सान्निध्यात सोहळा हवा,” असे म्हणणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

कळंबा–कात्यायनी परिसरातील फार्महाऊसवर आज विस्तीर्ण हिरवेगार लॉन्स, आकर्षक लँडस्केपिंग, स्विमिंग पूल, थीम डेकोरेशन, लाईव्ह किचन अशा ‘अर्बन-लक्झरी’ सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे साखरपुडा, डोहाळे जेवण, वाढदिवस, प्री-वेडिंग शूट, कॉर्पोरेट पार्ट्या आणि खास करून डेस्टिनेशन वेडिंगचे बुकिंग अनेक महिने आधीच भरू लागले आहे.

शहरापासून जवळ, प्रवास अत्यंत सोपा

कळंबा आणि कात्यायनी परिसर लोकप्रिय होण्याचे आणखी एक कारण म्हणजे उत्तम कनेक्टिव्हिटी. शहरातून केवळ १५-२० मिनिटांत या परिसरात पोहोचता येते. रुंद आणि सुलभ रस्त्यांमुळे पाहुण्यांना कार्यक्रमाला येणे–जाणे सोयीचे होते. लांबच्या रिसॉर्टवर जाण्यापेक्षा शहराच्या वेशीवरच आकर्षक फार्महाऊस मिळत असल्याने वेळ व खर्च दोन्ही बचत होऊ लागली आहे. त्यामुळे हा परिसर आता इव्हेंट मॅप वर ‘टॉप प्रेफरन्स झोन’ बनला आहे.

गुंतवणुकीचा नवा केंद्रबिंदू; रोजगारालाही चालना

वाढत्या मागणीमुळे या भागातील जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रिअल इस्टेटमध्ये मोठी उलाढाल होत असून गुंतवणूकदारांनीही या परिसराकडे वळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक वाटा खुल्या झाल्या आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेशन, केटरिंग, सुरक्षा, बागकाम, देखभाल या क्षेत्रांत स्थानिक युवक–युवती मोठ्या प्रमाणात काम करू लागले आहेत.

तथापि, या वाढत्या झगमगाटात पाण्याची उपलब्धता, शेतीचे बदलते स्वरूप आणि पर्यावरणीय संतुलन याकडे पुढील काळात विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.

हिवाळ्यात ‘हुरडा पार्ट्यांची’ लाट

सध्या हिवाळा असल्याने कळंबा–कात्यायनी परिसरात हुरडा पार्ट्यांना प्रचंड मागणी आहे. शहरातील अनेक ग्रुप संध्याकाळी फार्महाऊसवर एकत्र येऊन हुरडा, चुलीवरचे जेवण, शेकोटी आणि गाण्यांचा आनंद घेतात. त्यामुळे या भागातील रात्री अधिकच रंगतदार होऊ लागल्या आहेत.

शहराजवळ, तरी शांततेची अमूल्य देणगी

“दिवसभराचा ताण घालवण्यासाठी निसर्गासारखी औषधं नाहीत,” अशी भावना फार्महाऊस मालक व्यक्त करतात. शहरापासून जवळ असूनही इथली शांतता, मंद वारा, हिरवाई आणि एकांत यामुळे हा परिसर वीकेंड गेटवे ठरू लागला आहे.

शहरातील चार भिंतींच्या आड कार्यक्रम करण्यापेक्षा मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात लग्नसोहळा असावा, अशी आजच्या तरुणाईची इच्छा असते. कळंबा–कात्यायनी परिसर यासाठी अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे येथे फार्महाऊसना इव्हेंटसाठी मोठी मागणी आहे. – सागर भोगम

Advertisement
Tags :

.