For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कालाय तस्मै नम:

06:41 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
कालाय तस्मै नम
Advertisement

दिवाळी आली की हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे... झाली का रे तयारी? मुलं म्हणतात... हो झाली ना. आमच्या मोबाईलवरचे मेसेज डिलीट केलेत, व्हिडिओ डिलीट केलेत आणि ऑनलाईन शॉपिंगसुद्धा सुरू झाली. ही त्यांची स्वच्छतेची कल्पना आणि तयारी पाहून मला आमच्या पिढीने साजरी केलेली दिवाळी आठवली. घराला रंग देण्यापासून, आकाश कंदील बनवण्यापर्यंत, डबे घासण्यापासून अनेक पदार्थ घरातच उत्तम रीतीने तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टी करायला शिकवणारी दिवाळी आठवली. आणि म्हणूनच या लोकांची अशी उत्तरं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. माझी आजी दिवाळीसाठी भाजण्यांची पीठं, लाह्या, चकल्या, करंज्या, लाडू सगळं काही स्वत:च बनवायची. दुकानात कधी खरेदीला गेलेली मी तिला पाहिलं नाही. कारण त्या वेळेला आजोबा आणतील तीच साडी नेसण्याची प्रथा होती. आता दिवाळीची तयारी म्हणजे फक्त मॉलमध्ये शॉपिंग करत हिंडणारी पिढी पाहिली की हे सगळे विचार अगदी आवर्जून येतातच. आजीला साडी आणणारे आजोबा आणि वडील ठेवणीतले परीट घडीचे कपडे, कोट, टोपी असं घालूनच दिवाळी साजरी करत असत. प्रत्येकाला नवीन कपडे घेण्याची प्रथा त्यावेळेला नव्हतीच किंवा किंबहुना त्या काळी परिस्थितीच नव्हती म्हणा ना हवंतर. पण दिवाळी मात्र खूप हसरी आणि आनंदी वाटायची. प्रत्येक दिवसाचे महात्म्य सांगणाऱ्या कथा त्या त्या दिवसाची, प्राण्यांची, पूजा किंवा पदार्थ हे सगळं ठरलेलं जरी असलं तरी त्याची एक लज्जत वेगळीच असायची. कारण दिवाळीतले हे पदार्थ फक्त दिवाळीतच बनायचे. आता मात्र बाराही महिने हलवायाच्या दुकानात हे पदार्थ मिळत असल्यामुळे या पदार्थांची मजाच निघून गेलीये. पहाटेचं स्नान म्हणजे एक सोहळा असायचा. सुगंधी तेल, उटणे, पाट रांगोळी सह बंबातलं गरम पाणी, पहाटेच्या गारठ्याची गंमत वाढवायचे. नंतर नवीन कपडे घालून फटाके घेऊन देवळातल्या काकड्याला जायचं ठरलेलं असायचं आणि त्यानंतर किल्ले बनवणं. पण आता हे सगळं काही रेडिमेड मिळत असल्यामुळे याची मजा आम्ही कुठेतरी घालवून बसलोय. या सगळ्या भेटीगाठींच्या पुढे गिफ्ट आम्हाला जास्त महत्त्वाचे वाटायला लागलेत. कारण एकुलत्या एक आई-बाबांची एकुलती एक  मुलं असल्यामुळे नातेवाईकांची किंवा नात्यांची ओढ संपत आलीये. कोणी कोणाकडे जायचं असतं, फराळाला बोलवायचं असतं, हे सगळं संपून गेल्यामुळे, पाहुणे येणेच आम्हाला आता नकोसं झालंय. हॉटेलमधल्या जेवणाने रुचकर जेवणाची आणि प्रेमाने वाढण्याची लज्जत संपलीय. प्रदूषणाच्या नावाखाली बाहेर गावी फिरायला जाणारे आम्ही या सणाकडे पाठ फिरवून बसलोय. आपली संस्कृतीच जणू नष्ट करायला निघालोय, असं वाटतंय. पण हे सगळं जेव्हा परदेशातून आमच्यापर्यंत येईल ना तेव्हा आम्ही सगळे सणवार डोक्यावर घेऊन नाचत बसू. शेवटी काय ... ‘कालाय  तस्मै नम:’ म्हणतात ना तेच खरं.  ‘अंधाराला ओवाळायला सूर्य रोज येतो. चांदण्याच्या रांगोळीला रोज छान काढतो

Advertisement

चैतन्याच्या अंगणात रोजच असतो सण  एकमेकांच्या स्नेहामुळे जगत असतो सारे जण...’ या सणांमुळे तर माहेराचे मोहर तरारून येतात, अंधाराचेसुद्धा महोत्सव होतात. औक्षणाच्या ताटासाठी चंद्र आतुर असतात, माणसातील आपुलकी भिंतीनाही रंगवून जातात, अशी नात्यांची लज्जत खुमासदार करणारे सण, परिसर उजळतांना मनातला अंधार घालवण्यासाठी पणती मात्र आवर्जून लावतात. जी या झगमगाटात आता लुप्त होत चालली आहे. ती पुन्हा ओंजळीत जपायला हवी.

Advertisement
Advertisement
Tags :

.