For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कालाय तस्मै नम:!

06:44 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कालाय तस्मै नम
Advertisement

कालच्या विजयाचा मानकरी तरी कोण, रोहितच्या 41 चेंडूतील 92 धावा, अक्षर पटेलचा तो अविश्वसनीय झेल की चायनामन कुलदीप यादवची प्रभावी गोलंदाजी? तिन्ही गोष्टींनी मात्र भारताचा विजय सुकर झाला हे मात्र विसरून चालणार नाही  काही फलंदाज काही संघासाठी कायमचीच डोकेदुखी ठरतात. ट्रेव्हिस हेड हा त्यातलाच एक असा फलंदाज जो नेहमी भारतीयांना नकोसा वाटू लागला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ट्रेव्हिस हेड भारतीयांची खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरला होता. 218 दिवसापासून भारतीय संघावर जी जखम होती त्या जखमेवर काल मलम लावलं गेलं. माझ्या आयुष्यातील क्रिकेटमधील जे काही काळे दिवस आहेत त्यापैकी 19 नोव्हेंबर 2023 हा सर्वात मोठा काळा दिवस. एकावर एक, एकावर एक विजयाचा रतीब टाकल्यानंतर अंतिम फेरीत झालेला तो पराभव आठवला की मनात नैराश्य येते. हेच का ते क्रिकेट ज्याच्यासाठी आपण तहानभूक विसरून दूरदर्शनसमोर तासन्तास बसतो. माझ्यासारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्लेषक कधी समालोचन कक्षातून, तर कधी मैदानातून, तर कधी दूरदर्शनसमोर बसून क्रिकेटचं विश्लेषण करतो. कधी कधी ऐनवेळी शेवटी पदरी निराशाच येते. पण काल मात्र तसं काही घडलं नाही. क्रिकेटमध्ये  कुठल्याही पराभवाचा वचपा हा वर्मावर घाव करणाराच असावा. नेमकं तेच भारताने काल केलं.

Advertisement

काही ‘विजय’ हे झिंग आणण्यासारखे असतात. अगदी शॅम्पेनसारखे. ऑस्ट्रेलियाविऊद्धचा विजय हा तसाच होता. 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हातात सलग विजयाची माळ गुंफल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाने  हातातून कप हिसकावला होता. काल त्याच कांगाऊना भारतीय संघाने छोट्या फॉरमॅटमधील क्रिकेटमध्ये आसमान दाखवलं. रोहितच्या फलंदाजीचं रौद्ररूप पाहून काल क्रिकेटजगताला हेवा वाटला नसेल तरच नवल. मला खडूस संघाविऊद्ध जास्त आक्रमक होणं आवडतं किंबहुना त्यातच मला जास्त रस आहे, हे काल रोहितने दाखवून दिलं. रोहितचं फलंदाजीत जेवढे कौतुक, तेवढंच चायनामन कुलदीप यादव याचंही कौतुक करावं लागेल. आक्रमक फलंदाजांना अचूक टप्प्यावर कसं घेरावं, हे काल कुलदीपने दाखवून दिले. मॅक्सवेलला ज्या पद्धतीने क्रिकेटच्या भाषेत ‘रॉन्ग वन’ टाकून जो भारताचा जावई आहे त्याला खऱ्या अर्थाने काल क्रिकेटच्या भाषेत ‘मामा’ बनवलं.

बरं, काल भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर बांगलादेशविऊद्ध अफगाणिस्तान या सामन्यावर कांगारूंची थोडीफार आशा शिल्लक होती. परंतु काल अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारखाच बांगलादेशला दे धक्का दिला. आणि बघता बघता कांगारूंना पॅकअप करण्यास भाग पाडलं. एकंदरीत ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून कांगारू क्रिकेटच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर होता. दृष्ट लागण्यासारखीच त्यांची कामगिरी होती. परंतु मागच्या दोन सामन्यात कदाचित अति आत्मविश्वास त्यांना नडला. अर्थात हे मागील जे दोन पराभव झाले त्यातून भारताचे आणि अफगाणिस्तानच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही, हेही तेवढेच खरं. भारत आणि अफगाणिस्तान आता पाचव्या गियरमध्ये आहेत. किंबहुना मी तर असं म्हणेण, ते आता ड्रायव्हर्स सीटवर बसलेत. एकंदरीत काय भारत आणि अफगाणिस्तानने अगदी चाबूक प्रदर्शनाची पेशकश केलीय. ज्या ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तानला आणि भारतीय संघाला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या क्षणी दु:ख दिले होते, त्याच ऑस्ट्रेलियाला भारत आणि अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरूममध्ये सुतकासारखी परिस्थिती निर्माण केली नसेल तरच नवल. एकंदरीत काय वेळ तर सर्वांचीच येते. काल परवा ऑस्ट्रेलियाची होती. आज भारत आणि अफगाणिस्तानची आहे, एवढे मात्र खरं. सगळं कसं अविश्वसनीय आणि स्वप्नवत.

Advertisement

Advertisement
Tags :

.