वक्फ समितीत प्रचंड गदारोळ
बाटली फोडल्यामुळे तृणमूल खासदाराची गच्छंती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला आहे. बैठकीत या सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली असून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संतापाच्या भरात पाण्याची बाटली फोडल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वक्फ कायदा सुधारणा विधेयकातील काही तरतुदींवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. हे सुधारणा विधेयक मुस्लीमांचे अधिकार हिरावून घेण्यासाठी आणण्यात आले आहे, असा विरोधकांचा आरोप होता. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी विरोधकांचे आक्षेप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. विरोधक या विधेयकाला विरोध करुन मतपेढीचे राजकारण करीत आहेत. विशिष्ट वर्गाचे लांगूलचालन करण्याची विरोधी पक्षसदस्यांची प्रवृत्ती आहे. हे सुधारणा विधेयक राष्ट्रीय दृष्टीकोनातून मांडण्यात आले असून त्यावर राजकारण करणे सर्वथैव अयोग्य आहे. विरोधी पक्ष त्यांच्या संकुचित राजकीय दृष्टीकोनातून या विधेयकाकडे पहात आहेत, असा जोरदार प्रतिहल्ला सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी चढविला आहे.
प्रचंड वादावादी
भारतीय जनता पक्षाचे खासदार अभिजित गंगोपाध्याय आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात विधेयकातील काही मुद्द्यांवरुन जोरदार शब्दयुद्ध झाले. बोलण्याच्या भरात कल्याण बॅनर्जी यांनी काचेची पाण्याची बाटली उचलली आणि ती जोरात टेबलावर आपटली. यामुळे बाटली फुटून बॅनर्जी यांच्या हाताला जखम झाल्याची माहिती नंतर तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
अध्यक्षांकडून कारवाई
संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल यांनी कल्याण बॅनर्जी यांच्यावर कारवाई केली आहे. बॅनर्जी यांनी पाण्याने भरलेली बाटली फोडून शिस्तीचा भंग केला आहे. प्रत्येक सदस्याने बोलत असताना आपल्या संतापावर नियंत्रण ठेवावयास हवे. संयम सोडून बेताल वागणाऱ्या सदस्यांविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. त्यानुसार कल्याण बॅनर्जी यांची समितीतून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
प्रकार केव्हा घडला...
काही नामवंत विधिज्ञ आणि निवृत्त न्यायाधीशांच्या एका गटाला वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर मते मांडण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी निमंत्रित केले होते. त्यानुसार या गटाचे प्रतिनिधी त्यांचे मुद्दे समितीसमोर मांडत होते. मात्र, या गटाला समितीसमोर उपस्थित होण्याचा आणि त्यांची मते मांडण्याचा अधिकार नाही, असा दावा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला आणि त्यांच्या युक्तीवादाला विरोध त्यांनी विरोध केला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी या गटाच्या उपस्थितीचे समर्थन केले. त्यातून दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. त्यावेळी हा बाटली फोडण्याचा प्रकार घडला.
प्रत्येक वेळी गदारोळ
वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर आतापर्यंत संयुक्त संसदीय समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप समिती निश्चित निष्कर्षावर पोहचलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्येक बैठक वादविवाद आणि शाब्दीक युद्धाने गाजली आहे. आगामी शीतकालीन अधिवेशनात हे सुधारणा विधेयक संसदेत सादर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. याच अधिवेशनात ते संमत करुन घेण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठड्यांमध्ये या विधेयकासंबंधी संयुक्त संसदीय समिती अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.