कलाधिपती महोत्सवाने साजरा केला गणेशोत्सव
भूपाळी, ओवी, पिंगळी, हेळवी, वासुदेव, बहुरुपी, पोतराज, कडकलक्ष्मी, गवळण, भारुड, लोकनाट्या, लावणी, नंदीबैल, भैरवी आदींचे सादरीकरण
बेळगाव : सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटीची कल्चरल अकादमी आणि मराठी विभाग आयोजित कलाधिपती महोत्सवाचे आयोजन दि. 3 सप्टेंबर रोजी एस.के.ई. सोसायटीच्या के. एम. गिरी सभागृहात करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन व प्रास्ताविकानंतर विद्यार्थ्यांना लोकसाहित्य आणि लोकपरंपरा यांचा अभ्यास होण्याच्यादृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपल्या पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लोकप्रिय ‘भूपाळी ते भैरवी’ या लोककलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. सांगलीचे संपत कदम आणि त्यांचा संघ प्रस्तुत ‘भूपाळी ते भैरवी’ कार्यक्रमाची सुऊवात गणरायाला वंदन करून झाली.
हरवत चाललेल्या लोककला, नृत्य, नाट्या या अभिनयाने कार्यक्रम खुलत गेला. भल्या पहाटेची भूपाळी, जात्यावर दळण दळताना गायिली जाणारी ओवी, भल्या पहाटे कुडमुड्याच्या निनादात ‘व्हणार’ सांगत येणारा ‘पिंगळा’ जोशी, अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव, खदखदून हसवणारा बहुरुपी, अंगावर आसूड ओढणारा पोतराज, कडकलक्ष्मीवाला, नटखट गवळण, विनोदातून अध्यात्म सांगणारं भारुड, लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी, ढंगदार लावणी, मोटेवरचं गीत, नंदीबैल, कोळीनृत्य, आदिवासी नृत्य, धनगरी ओव्या, एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी आदींचे सादरीकरण झाले. रसिक, विद्यार्थ्यांच्या, टाळ्या आणि हशा यांनी कार्यक्रमामध्ये रंगत वाढत गेली आणि कलाकारांनी मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनघा वैद्य यांनी केले व आभार प्रा. परसू गावडे यांनी मानले.