For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध मुद्द्यांवरून काकती ग्रामसभा गोंधळात पार

10:55 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध मुद्द्यांवरून काकती ग्रामसभा गोंधळात पार
Advertisement

अनेक समस्यांच्या प्रश्नांना ग्रा. पं. सदस्यांकडून बगल : ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येवर सदस्यांकडूनच हस्तक्षेप 

Advertisement

वार्ताहर/काकती

गंगेकोळ नाल्यावरील खासगी अतिक्रमण हटवून दहा फूट सिमेंट काँक्रिट रस्ता, दवाखाना, शालेय मुला, मुलींना सर्व्हिस रोडने नियमीत बससेवा, देसाई गल्ली येथे प्रमुख बस स्टॉप (थांबा), अंगणवाडी सेविकांची जबाबदारी, प्रत्येकांना संगणकीय उतारा आदी विविध विषयांवर काकती येथील ग्रामसभा मंगळवारी गाजली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर होत्या. ता. पं. लेखाधिकारी नीता सूर्यवंशी यांनी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

Advertisement

स्वागत व प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी अरुण नाथबुवा यांनी केले. डोंगरमाथ्यावरुन लोहार बसवाण्णा येथून उगम पावलेल्या गंगेकोळ नाल्यावरती खासगी घरांची झालेली अतिक्रमणे हटविणे तसेच करगुप्पीकर वाड्याच्या पाठीमागील नाल्यावरती दहा फूट सिमेंट कॉक्रिंटचा रस्ता करणे व सुसज्ज दवाखाना हॉस्पिटल बांधणे हे लक्षवेधी प्रश्न लक्ष्मण पाटील यांनी उचलून धरले. या समस्येला सिद्राई बेडका, भारत करगुप्पीकर, संजू थोरले यांनी पाठिंबा दिला.

हॉस्पिटल महत्त्वाचे की कुस्ती आखाडा?

नाल्यावरील अतिक्रमणबाबत संबंधित सदस्य अनुत्तरीत राहिले. तर हॉस्पिटल बांधण्याकरिता किमान एक एकर जागा असेल तर बांधण्याची मंजुरी मिळते, किंवा किमान प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी गावच्या रस्त्यापलिकडील गावांसाठी दोन गुंठे जागा व जुन्या गावासाठी दोन गुंठे जागा ग्राम पंचायतीने मिळवून द्यावी, असे वंटमुरी आरोग्य केंद्राचे ज्येष्ठ आरोग्य अधिकारी मंजुनाथ यांनी सांगितले. यावेळी मध्येच हस्तक्षेप करून ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण कोळेकर, मनोहर शेखरगोळ यांनी अष्टगीर कुस्ती आखाड्यात हॉस्पिटल बांधण्यात यावे, असे सांगून कुस्ती आखाड्यापेक्षा हॉस्पिटल महत्त्वाचे असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी सदर दवाखाना शिवारातील जागेत बांधण्यात यावे या मुद्यावरून ग्रामस्थ लक्ष्मण पाटील व सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

अडथळा न आणता संगणकीय उतारे काढून देण्याची मागणी

अंगणवाडी सेविका सुजाता कर्णम या ग्रा. पं. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, अंगणवाडीत किमान 25 बालकांची आवश्यकता असते. बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण, माता-बालकांच्या आहार-आरोग्यसेवेकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याची मागणी केली. तर परिवहन मंडळाने बसेस काकतीला विद्यार्थ्यांच्या वेळेत सोडावीत व सर्व्हिस रोडवरून बसेस धावाव्यात. अनेकवेळा ग्रामस्थ व महिलांनी निवेदन देवूनसुद्धा राष्ट्रीय महामार्गानेच बसेस धावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे अपघात होत असल्याचे सांगितले. याला परिवहन मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. जि. पं.च्या नियमानुसार अडथळे न आणता ग्राम पंचायतीने संगणकीय उत्तारे काढून द्यावेत, अशी मागणी सिद्राई पाटील व ग्रामस्थांनी यावेळी केली.

समस्या ऐकून घेत नसल्याने महिलावर्ग सभेतून बाहेर

अनेक समस्यांना समर्पक उत्तरे ग्राम पंचायतीकडून मिळू शकली नाहीत. ग्रामसभेत ग्रामस्थ व माहिलांपेक्षा ग्रा.पं.सदस्यांच्या हस्तक्षेपाने अनेकवेळा सभेत गोंधळ माजला. अनेकवेळा पिडीओ अरुण नाथबुवा यांनी गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी शांतता राखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रमुख समस्यांना बगल देत ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सदस्यांकडून करण्यात आला. परिणामी ग्रामसभेत ग्रामस्थांना समस्या मांडण्याचा अधिकार असूनही मोकळेपणाने बोलू दिले जात नाही, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. यामध्ये नोडल अधिकाऱ्यांनीही आपली भूमिका व्यवस्थित बजावली नाही. यामुळे संतप्त महिलावर्गाने ग्रामसभेतून काढता पाय घेतला.

Advertisement
Tags :

.