कैगा अणुभट्टीसाठी 21 हजार कोटींचा खर्च येणार
कैगा प्रकल्पाचे साईट डायरेक्टर बी. विनोदकुमार यांची माहिती
कारवार : कैगा अणुउर्जा प्रकल्पातील प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या (क्रमांक 5 व 6) उभारणीच्या कार्याने वेग घेतला आहे. या अणुभट्ट्या उभारणीचे काम नोव्हेंबर 2030 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कैगा प्रकल्पाचे साईट डायरेक्टर बी. विनोदकुमार यांनी दिली. ते कैगा प्रकल्पस्थळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, अणुभट्टी क्रमांक 5 व 6 उभारणीच्या कार्याला 2022 मध्ये चालना देण्यात आली आहे. एकूण 1400 मेगावॅट उर्जा निर्मितीची क्षमता असलेल्या या दोन अणुभट्ट्यांच्या उभारणीवर सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन अणुभट्ट्यांमुळे सुमारे 8 ते 12 हजार इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. या दोन अणुभट्ट्यांच्या उभारणीला सर्व संबंधितांकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे आता पाठीमागे वळून पहायचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे स्पष्ट करून विनोदकुमार यांनी अणुभट्टी क्रमांक 5 आणि 6 उभारणीसाठी पुन्हा जमीन संपादन करण्याची काही एक गरज नाही. त्यामुळे यापूर्वीच संपादीत करणाऱ्या जमिनीवर या अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत. परिणामी विस्थापित समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही.
कैगा प्रकल्पातून रेडीएशनची शक्यता नाही
कारवार जिल्ह्यात कर्करुग्णांच्या होणाऱ्या वाढीला कैगा अणुउर्जा प्रकल्प जबाबदार असल्याची अफवा पसरविली जात आहे. तथापि, या अफवा, आरोपांमध्ये काही एक तथ्य नाही, असे स्पष्ट करून विनोदकुमार पुढे म्हणाले, कैगा प्रकल्पापासून काही किलो मीटर अंतरावरील मल्लापूर येथे प्रकल्पातील कर्मचारी गेल्या तीस वर्षापासून वास्तव्य करून आहेत. कैगा प्रकल्पात वापर करून सोडून देण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर कैगा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. कैगा प्रकल्पातून रेडीएशन होत आहे, असा जो काही आरोप केला जात आहे तो बिनबुडाचा आहे.
50 टक्के उर्जा कर्नाटकाला पुरविली जाणार
कैगा अणुउर्जा प्रकल्पातील अणुभट्टी पाच आणि सहा पूर्णत्वाला गेल्यानंतर या अणुभट्ट्यातून निर्माण होणारी 50 टक्के उर्जा 100 मेगावॅट कर्नाटकाला दिली जाणार आहे. कार्यरत असलेल्यांच्या अणुभट्ट्यांमधील 35 टक्के (880 मेगावॅटपैकी 35 टक्के) उर्जा कर्नाटकाला दिली जात आहे. नियोजित अणुभट्ट्यातील 50 टक्के उर्जेमुळे कर्नाटकाची उर्जाबाबतची बाजू बळकट होणार आहे.
सीएसआर अंतर्गत 110 कोटी रुपये खर्च
कैगा अणुउर्जा प्रकल्प कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत स्थानिक जनतेवर प्रत्येक वर्षी 9 ते 16 कोटी रुपये खर्च करीत आहे. आजअखेर प्रकल्पातर्फे सीएसआरवर 110 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.