वड्डर छावणीतील दलित वसाहतीला काडसिद्धेश्वर स्वामीजींची भेट
गुंडांकडून हल्ला झालेल्या तरुणांची विचारपूस
बेळगाव : वड्डर छावणी येथील दलित वसाहतीला कोल्हापूर कणेरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी व श्री हर्षानंद स्वामीजींनी भेट दिली. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांची विचारपूस करतानाच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणीही स्वामीजींनी केली. किसन कदम लोंढे व किसन चौगुले या दलित युवकांवर हल्ला करण्यात आला आहे. एकावर एक वर्षापूर्वी तर दुसऱ्या तरुणावर महिन्यापूर्वी चाकू हल्ला झाला आहे. पंधरा ते वीस जणांच्या अन्य धर्मीय टोळक्याने गुंडगिरी करीत हल्ला केला आहे. हा दलितांवरील अन्याय सरकारने त्वरित रोखावा. नहून साधूसंतांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी प्रशासनाला दिला. वड्डर छावणी परिसरात पुष्पवृष्टी करून स्वामीजींचे स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी आरती करून घरात स्वागत केले. मीराबाई लोंढे, लता लोंढे, चंद्रकला लोंढे, गौतम लोंढे, हणमंत वड्डर, आप्पाराम राव, सुनील गौरण्णा, रोहित रणसुभे, कृष्ण भट्ट यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. स्वामीजींनी तरुणांच्या कुटुंबीयांना धीर दिला. त्यांच्या घरी त्यांनी प्रसादही स्वीकार केला.