जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कडोलीत
मंगळवारी तब्बल 134 मि. मी. पाऊस : बेळगाव तालुक्याला वळीव पावसाने झोडपले
बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी धुवाधार वळीव पाऊस झाला. विशेषत: तालुक्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कडोली गावामध्ये झाल्याची नोंद झाली आहे. 134 मि. मी. पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. कर्नाटक स्टेट नॅचरल डिझास्टर मॉनिटरिंग सिस्टमकडून दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक पाऊस कडोली गावामध्ये झाला. त्यापाठोपाठ बंबरगा 127 मि. मी., निलजी येथे 112 मि. मी. तर कंग्राळी बी. के. येथे 105 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस झाला. शहरात कॅम्प, नेहरुनगर या परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला. परंतु त्या तुलनेत तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. 100 मि. मी. पेक्षा अधिक पाऊस तालुक्याच्या उत्तर भागात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. वळिवाने जोरदार सलामी दिल्याने बसवण कुडची येथील मंदिरात तीन ते चार फूट पाणी साचले होते. बेळगावसोबतच सौंदत्ती येथील होसूर येथे 127 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शेजारील धारवाड जिल्ह्यापेक्षाही मंगळवारी पावसाचा जोर बेळगावमध्ये दिसून आला. वळिवाच्या पावसाने मशागतीच्या कामाला मदत होणार असली तरी भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे.