कडोली मराठी साहित्य संमेलन उद्या
दिग्गज साहित्यक उपस्थित राहणार : संमेलनाची जय्यत तयारी : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण
वार्ताहर/कडोली
रविवार दि. 19 रोजी होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि कडोली मराठी साहित्य संघाच्या कार्यालयासमोर पेव्हर्स बसवून सुशोभिकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला आणि कडोली मराठी साहित्य संघाच्या कार्यालयासमोरील परिसर अस्वच्छ दिसत होता. त्यामुळे हा परिसर पेव्हर्स बसवून सुशोभिकरण करावा, अशी मागणी होत होती. याची दखल घेत कडोली ग्राम पंचायतीने नरेगा योजनेतून एक लाख मंजूर केले तर उर्वरित लागणारी रक्कम कार्यकर्त्यांनी वर्गणीद्वारे जमा करून सदर कामाला सुरूवात केली आहे. यामुळे या सुशोभिकरणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आणखीन शोभून दिसत आहे. या सुशोभिकरणामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.
साहित्यिकांचा परिचय
संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे, मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांना अधिव्याख्याता उपकुलसचिव, प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, परीक्षा नियंत्रण प्रभारी कुलसचिव, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मोठा अनुभव आहे. वेध आणि वेधक, प्रतिभेचे प्रदेश, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, भजनांचे भजन, साहित्याचे सांस्कृतिक संचित, साठोत्तरी साहित्य प्रवास, पंचधाराच प्रदेश, वेदनांचा प्रदेश हे ग्रंथ तर मोगडा, बलुतेदार, गावगाड्याचे शिल्पकार, बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे हे समाज चिंतनावर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आले ठग, गेले ठग हा कविता संग्रह, दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारित ग्रंथ लिहिला आहे. जास्वंद, युवाकंप, जातक, दु:खाविषयी निबंध, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आणि शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांच्या या साहित्याबद्दल असलेल्या लेखनाबद्दल त्यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले आहे. शिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अण्णाभाऊ साठे, नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी विद्रोही साहित्य संमेलन, मराठवाडा युवक साहित्य संमेलन, 18 वे नरहरी कुरुंदकर साहित्य संमेलन, शिरुर दुसरे मराठी साहित्य संमेलन आणि पहिल्या मराठवाडा युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले आहे.
व्याख्याते : डॉ. संजीव माने
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा या गावातील डॉ. संजीव माने यांनी कृषी क्षेत्रात विशेष करून ऊस उत्पादनात नवी क्रांती आणली आहे. ऊस उत्पादन चळवळीचे जनक म्हणून परिचित असलेले संजीव माने यांना कृषी भूषण, कृषिरत्न पुरस्काराने महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरविण्यात आले आहे. आधुनिक पद्धतीनुसार शेती व्यवसाय करून उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यामुळे देश विदेशातून जवळपास 5 लाखाहून अधिक शेतकरी, शास्त्रज्ञ, पदाधिकारी यांनी डॉ. संजीव माने यांच्या शेतीस भेट देऊन पहाणी केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी अधिक ऊस उत्पादन आणि ठिबक सिंचन याविषयी समोरासमोर चर्चा झाली आहे. त्यांच्या यशस्वी शेतीमुळे अमेरिका हार्वर्ड युनिव्हर्सिटी बोस्टन येथे आयोजित जागतिक कृषी परिषदेस भारतातील यशस्वी शेतकरी म्हणून निमंत्रण, त्यांना विविध संस्थांच्यावतीने 67 पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. त्यांनी विविध साखर कारखान्यावर अनेक पदावर काम केले आहे. तर 2439 हून अधिक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.
कथाकथनकार : प्रा. संजय खोचारे
भुदरगड तालुक्यातील प्रा. संजय तुकाराम खोचारे यांचे शिक्षण एमएबीएड (मराठी), एमए (अर्थशास्त्र), एमए (समाजशास्त्र) झाले असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शिवारगाथा हा काव्य संग्रह तर बोलकी फुले हा बालकथा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या काव्य संग्रहास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेत विशेष काव्य पुरस्कार, मायबोली साहित्य प्रतिष्ठान राधानगरी यांचा सद्भावना पुरस्कार, डॉ. न. ना. देशपांडे पुरस्कार, कोनवडे येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी दै. तरुण भारतसाठी बातमी लेखन केले आहे.
कवी : अपूर्व राजपूत
अपूर्व राजपूत हे समकालीन मराठी कवितेतील सुप्रसिद्ध तरुण कवी, गझलकार आणि गीतकार आहेत. मराठी कविता आणि गझल सोशल मीडियाच्या पटलावर आणण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचा ‘मध्यांतर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस तरुणामध्ये लोकप्रिय होत आहे. हे प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर सारख्या ऐतिहासिक सभागृहात करून मराठी कवितेच्या कार्यक्रमांना व्यावसायिक यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. सोबतच गीतकार म्हणून सुद्धा ते प्रसिद्धीस येत आहेत. त्यांनी लिहिलेले ‘बोभाटा आणि सखा पांडुरंग’ ही गाणी प्रसिद्ध आहेत. त्यांचे शेकडो वक्तृत्व, वादविवाद आणि काव्यवाचन स्पर्धा ते स्वत:चा सोलो प्रयोग व ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही आजवरचा प्रवास प्रेरणा देणारा आहे.
कवी : प्रा. रोहित शिंगे
प्रा.रोहित शिंगे यांनी नेट आणि मराठीत एमए ही पदवी प्राप्त केली असून दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात इचलकरंजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते कवी, व्याख्याता आणि निवेदक म्हणून परिचित आहेत. 2019 साली कराड येथे परिसर स्पर्श आयोजित राज्यस्तरीय काव्यसम्राट या स्पर्धेचा काव्यसम्राट पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजवर 75 हून अधिक ठिकाणी त्यांची विविध विषयावर व्याख्याने झाली आहेत. शिवाय वक्ता म्हणूनही त्यांना अनेक ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. कवी संमेलनाबरोबर इतर कार्यक्रमांनाही त्यांना निवेदक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मासिक आणि दिवाळी अंकातून त्यांनी लेखन केले आहे.
कवयित्री : डॉ. अनिता खेबुडकर
डॉ. अनिता खेबुडकर या संजीव न्युरोसर्जिकल सेंटर, मिरज येथे एच.ओ.डी. पदावर कार्य करत असून साहित्य लेखनातही आपला ठसा उमटविला आहे. त्यांना ग्रामीण साहित्य लेखनासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भोपाळचा काव्यधारी पुरस्कार, तुमकूरचा काव्यरत्न पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, हिमाचल प्रदेशचा बिलासपूर सन्मान पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, श्री सुब्रम्हण्यम साहित्य अकादमी माचीगड काव्यभूषण पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या अस्तित्व, पेरणी या काव्य संग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
उद्घाटक : शिवाजी नागेंद्र अतिवाडकर
40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभलेले शिवाजी नागेंद्र अतिवाडकर हे बेळगाव परिसरातील एक नामवंत उद्योजक म्हणून परिचित असून बांधकाम व्यवसायात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. एक तज्ञ प्रथितयश आणि प्रामाणिक व्यवसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. एक शिक्षकप्रेमी, समाजप्रेमी, साहित्यप्रेमी, उत्कृष्ट संघटक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच हायस्कूलच्या सुधारणा समितीवर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शाळा सुधारणा समितीवर संचालक म्हणून काम पाहतात. बेळगावच्या पश्चिम भागात सांस्कृतिक, साहित्यिक संमेलने भरविण्यातही त्यांचा पुढाकार असतो.






